‘बिग बॉस ओटीटी’चं नवीन पर्व अवघ्या एका दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिसऱ्या पर्वाबद्दल सध्या प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच आता शोच्या प्रीमियरआधी ‘बिग बॉस ओटीटी’च्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या नव्या पर्वात अनिल कपूर होस्ट म्हणून झळकणार आहेत. सीझन चालू होण्यापूर्वीच यंदा घरात कोण प्रवेश करणार याबद्दल सोशल मीडियावर देखील चर्चा रंगल्या आहेत.

‘बिग बॉस ओटीटी’च्या नव्या सीझनचा लॉचिंग सोहळा नुकताच पार पडला होता. यावेळी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा लाँच इव्हेंट मुनव्वर फारुकीने होस्ट केला होता. यंदा घरात काय काय खास असणार याबद्दल जाणून घेऊयात…

हेही वाचा : “माझी खुर्ची बाहेर सरकवली अन् वेगळं बसवलं”, माधुरी पवारने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “नाव घेणार नाही, कारण…”

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या व्हायरल फोटोंमध्ये घरातील एका भिंतीवर एक मोठा आरसा दिसत आहे. या आरशाला एकदम रॉयल लूक देण्यात आला आहे. याशिवाय घराच्या कानाकोपऱ्यात विविध पेंटिंग्स लावण्यात आली आहेत. यामुळे ‘बिग बॉस’च्या घराला एक वेगळा लूक मिळाला आहे.

दुसऱ्या बाजूला घराचं किचन आहे. प्रशस्त अशा किचनमध्ये स्पर्धकांना सगळ्या आधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. बाहेरच्या गार्डन परिसरात सुंदर असे कारंजे लक्ष वेधून घेतात. बेडरुम सजवण्यासाठी मेकर्सनी मजंठा रंगाच्या शेड्सचा वापर केला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे कॅप्टन रुम वेगळी असेल.

हेही वाचा : हिंदुत्वाबद्दल बोलत असताना अचानक भाषण आटोपण्याची चिठ्ठी आली अन्…; नाराज शरद पोंक्षे म्हणाले, “म्हणून मला इथे…”

यंदाचा ‘बिग बॉस ओटीटी ३’चा सीझन बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर होस्ट करणार आहेत. याशिवाय जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर, निर्मात्यांनी पहिल्या दोन स्पर्धकांची झलक दाखवणारे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या क्लिपमध्ये वडापाव गर्ल विकणारी महिला दृष्टीस पडते यामुळे ही दुसरी तिसरी कोणीही नसून दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित असल्याचा अंदाज चाहत्यांनी लगेच बांधला आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये टोपी घातलेला एक व्यक्ती रस्त्यावर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर नेटकऱ्यांनी हा रॅपर नेझी असल्याचा अंदाज बांधला आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’चं हे तिसरं पर्व २१ जून पासून जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. याआधीचे सीझन प्रेक्षकांसाठी मोफत होते पण, या नव्या सीझनसाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत.