Dhurandhar OTT Release Update: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहचा स्पाय अॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ४० दिवसांनंतरही तो बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. थिएटर गाजवल्यानंतर हा चित्रपट लवकरच ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार आहे.

ज्या लोकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्यापेक्षा घरी चित्रपट पाहायला आवडतं, त्यांना ‘धुरंधर’ आता घरबसल्या पाहता येणार आहेत. धुरंधरच्या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत नवीन माहिती समोर आली आहे. अक्षय खन्नाचा हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे.

ओटीटी प्लेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धुरंधर’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी ओटीटीवर रिलीज होईल. नेटफ्लिक्स किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृतपणे याची पुष्टी केलेली नाही. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर फक्त सबस्क्रायबर्ससाठी उपलब्ध असेल. नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर धुरंधर हा चित्रपट आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

धुरंधर सिनेमा दमदार कथानकामुळे व कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे खूप गाजला. खरे वाटणाऱ्या अ‍ॅक्शन दृश्यांसाठी अजूनही सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण, चित्रपटाचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त आहे, तरीही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.

धुरंधर चित्रपटाची कथा

धुरंधरमध्ये रणवीर सिंहने मुख्य भूमिका साकारली आहे. रणवीर सिंह गुन्हेगार असतो, तो तुरुंगात असतो. आर. माधवनने आयबी प्रमुख अजय सान्याल ही भूमिका साकारली आहे. ते रणवीरला एका धोकादायक गुप्त मोहिमेवर पाठवतात. यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. खोट्या ओळखीखाली, त्याला कराचीला पाठवलं जातं. तिथे तो धोकादायक अशा लियारी भागात प्रवेश करावा लागतो. हळूहळू गुन्हेगारीच्या या अंधाऱ्या जगात तो दहशतवादी संघटना आणि आयएसआय यांच्यातील दुवा म्हणून काम करणाऱ्या एका जीवघेण्या नेटवर्कला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो.

धुरंधर या बॉलीवूड चित्रपटाने भारतात ८१३.६ कोटी कमावले आहेत. तर परदेशातही तो चांगली कामगिरी करत आहे. ४१ दिवसांनंतर धुरंधरचे जगभरातील एकूण कलेक्शन १२६९.१ कोटी कलेक्शन झाले आहे.