जुलै महिन्यात विविध आशयांवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. सई ताम्हणकरचा उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट सुद्धा महिन्याभरापूर्वी प्रदर्शित झाला होता. यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी होती. आता हा थ्रिलर सिनेमा चाहत्यांना घरबसल्या पाहता येणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘बोल बोल राणी’! ‘बोल बोल राणी’ या थ्रिलर चित्रपटात सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे या दमदार कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती सिड विंचुरकर यांची होती. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

‘बोल बोल राणी’ सिनेमा प्रेक्षकांना आता Amazon Prime वर पाहता येणार आहे. चाहते केव्हाही हा सिनेमा आता अमेझॉन प्राइमवर पाहू शकतात. या चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेकांनी हा थ्रिलर सिनेमा हिंदी भाषेतही उपलब्ध करून द्यावा अशी मागणी दिग्दर्शकाकडे कमेंट्समध्ये केली आहे.

‘बोल बोल राणी’च्या माध्यमातून १५ वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र झळकले होते. हा चित्रपट केवळ एक साधी गोष्ट नसून, एका महिलेच्या अवतीभवती घडणाऱ्या गुंतागुंतीच्या रहस्याचा थरारक प्रवास आहे. रहस्य, थ्रिल या सगळ्याचा अनुभव हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना येईल. याशिवाय सई ताम्हणकरचे वेगवेगळे लूक लक्ष वेधून घेतात आणि तिची नेमकी भूमिका कशी आहे याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.

चित्रपटाबद्दल निर्माते, दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, “थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणं नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणं. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ आहे. प्रेक्षकांनी हा थरार अनुभवण्यासाठी सज्ज राहावं. ‘बोल बोल राणी’ हा केवळ एक सस्पेन्स चित्रपट नसून, मानवी स्वभावाचं आणि नातेसंबंधांचं अनेक पदर उलगडणारा एक थ्रिलर अनुभव आहे. आजचा प्रेक्षक सुजाण आहे, त्याला पडद्यावर काहीतरी वेगळं आणि खिळवून ठेवणारं हवं असतं. या चित्रपटाची कथा आणि त्यातील प्रत्येक पात्राचा संघर्ष प्रेक्षकांना शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडतील.”