JioHotstar Trending Movie: काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात, पण ओटीटीवर आल्यावर त्यांचं नशीब बदलतं. जो चित्रपट थिएटरमध्ये कधी रिलीज झाला आणि कधी स्क्रीनवरून गायब झाला हे माहित नसतं, तोच चित्रपट ओटीटीवर मात्र धुमाकू घालतो. ओटीटीच्या ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत झळकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. हा चित्रपट थिएटरमध्ये सपशेल आदळला, पण ओटीटीवर ट्रेंडिंग आहे.

या चित्रपटाचं नाव आहे गुस्ताख इश्क. या चित्रपटातून फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात विजय वर्मा, फातिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक मिळाले नाही, पण ओटीटीवर हा चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय.

गुस्ताख इश्कचे बजेट व कलेक्शन

‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटाची कथा १९९८ सालच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. ‘गुस्ताख इश्क’ने बॉक्स ऑफिसवर जगभरात फक्त २.७ ते २.९ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २५ कोटी होते, ज्यामुळे तो त्याच्या बजेटच्या १० टक्के रक्कम वसूल करू शकला होता. पण हा चित्रपट आता ओटीटीच्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. रोमँटिक चित्रपट ज्यांना आवडतात, त्यांना ‘गुस्ताख दिल’ फारच भावला आहे. प्रेक्षक या सिनेमातील मुख्य कलाकारांच्या कामाचे कौतुक करत आहेत.

२७ जानेवारी २०२६ रोजी ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ दोन महिन्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर येताच या चित्रपटाने जिओ हॉटस्टारवरील टॉप चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. गुस्ताख इश्क सध्या चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

फातिमा सना शेख आणि विजय वर्मा यांचा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. येत्या काळात चित्रपटाला किती व्ह्यूज मिळतात हे पाहणं मनोरंजक असेल. पण चित्रपटाला थिएटरपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नक्कीच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हीही रोमँटिक चित्रपटांचे चाहते असाल तर गुस्ताख इश्क ओटीटीवर पाहायला विसरू नका. २ तास ८ मिनिटांचा हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. गुस्ताख इश्कला आयएमडीबीवर ७.८ रेटिंग मिळाले आहे.