Chetak Screen Awards 2026: काही वर्षांपूर्वी ओटीटी नावाचे एक माध्यम भारतात आले आणि त्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता ओटीटीची लोकप्रियता इतकी वाढली आहे की लोक थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य गेतात. ओटीटीमुळे निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे. यामुळे थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर फ्लॉपचा धोका कमी झाला आहे. मागे वळून बघायचं झाल्यास गेल्या वर्षी थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये खूप विविधता दिसून आली.

या विविधतेची झलक यंदाच्या चेतक स्क्रीन अवॉर्ड्समधील ‘बेस्ट ओटीटी फिल्म नॉमिनेशन’मध्येही पाहायला मिळाली. यामध्ये कौटुंबिक कथांपासून ते थ्रिलर आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांपर्यंत सर्वच प्रकारच्या चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या दमदार कथा, अभिनय आणि भूमिकांच्या जोरावर ‘मिसेस’ (Mrs.), ‘रात अकेली है’, ‘द बन्सल मर्डर्स’, ‘स्टोलन’, ‘द ग्रेट शमशुद्दीन फॅमिली’ आणि ‘द मेहता बॉइज’ या चित्रपटांनी या कॅटेगरीत स्थान मिळवलंय.

  • मिसेस (झी5) – हा चित्रपट पारंपारिक लग्नांमधील पुरुषसत्ताक अपेक्षांवर परखड भाष्य करतो.
  • रात अकेली है, द बन्सल मर्डर्स (नेटफ्लिक्स)- हनी त्रेहान दिग्दर्शित हा ‘क्राइम ड्रामा’ छोट्या शहरांमधील गुन्हेगारी विश्वाचा धांडोळा घेतो.
  • स्टोलन (प्राइम व्हिडीओ): करण तेजपाल यांचा हा थ्रिलर चित्रपट शहरातील दोन भावांची कथा सांगतो. हे दोघे नकळतपणे एका मुलाच्या अपहरणाच्या प्रकरणात अडकतात.
  • द ग्रेट शमशुद्दीन फॅमिली (जिओहॉटस्टार): अनुषा रिझवी यांचा हा चित्रपट आणि बोमन इराणी दिग्दर्शित ‘द मेहता बॉइज’ हे कौटुंबिक चित्रपट आहेत.

‘मिसेस’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त आणखी तीन नामांकनं मिळाली आहेत. त्यात सान्या मल्होत्रा (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), आरती कडाव (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि सर्वोत्कृष्ट पटकथा याचा समावेश आहे.

Award Banner

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व अभिनेत्याचे नामांकन मिळालेले कलाकार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (OTT फिल्म्स) या शर्यतीत सान्या मल्होत्राबरोबर फातिमा सना शेख (आप जैसा कोई), राधिका आपटे (साली मोहब्बत), सबा आझाद (सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज), मिया मेल्झर (स्टोलन), फरीदा जलाल (द ग्रेट शमशुद्दीन फॅमिली) आणि श्रेया चौधरी (द मेहता बॉइज) यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता (OTT फिल्म्स) या श्रेणीत मनोज बाजपेयी (इन्स्पेक्टर झेंडे), अभिषेक बच्चन (कालिधर लापता), नवाजुद्दीन सिद्दीकी (रात अकेली है: द बन्सल मर्डर्स), अभिषेक बॅनर्जी (स्टोलन) आणि शुभम वर्धन (स्टोलन) यांना नामांकन मिळालं आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या गौरवार्थ ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ची नामांकनं जाहीर झाली आहेत. यामध्ये ‘मिसेस’, ‘स्टोलन’ आणि ‘द मेहता बॉइज’ यांसारख्या चित्रपटांनी बाजी मारली असून, सान्या मल्होत्रा आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार शर्यतीत आहेत. यापैकी कोण बाजी मारणार, ते ५ एप्रिलला पुरस्कार सोहळ्यात कळेल.