जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच ‘चिरैया’ नावाची एक वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. या सीरिजची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. ‘चिरैया’ सीरिजमध्ये वैवाहिक बलात्कार यासारख्या अत्यंत गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. ६ भागांच्या या सीरिजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. यामध्ये अरुण आणि पूजा यांच्यातील ‘वेडिंग नाईट’चा सीन सध्या खूप चर्चेत आहे. हा सीन अभिनेता सिद्धार्थ शॉ आणि अभिनेत्री प्रसन्ना बिष्ट यांच्यावर चित्रीत करण्यात आला आहे. हा सीन शूट करताना सिद्धार्थची अवस्था खूप खराब झाली होती आणि त्याला रडू कोसळलं होतं.

‘चिरैया’मध्ये सिद्धार्थ शॉ याने ‘अरुण’ची आणि प्रसन्ना बिष्ट हिने ‘पूजा’ची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील लग्नाच्या रात्रीचा सीन अतिशय भीतीदायक आणि मनाला चटका लावणारा आहे. नुकताच सिद्धार्थ आणि प्रसन्ना यांनी या सीरिजमधील कामाचा अनुभव शेअर केला. तो कठीण सीन शूट करण्यापूर्वी सिद्धार्थ अक्षरशः रडू लागला होता, असं प्रसन्नाने सांगितलं.

सुहागरातच्या सीनवेळी रडू लागला होता सिद्धार्थ

प्रसन्ना ‘फिल्मीज्ञान’शी बोलताना म्हणाली, “सिद्धार्थसाठी ही सीरिज करणं अजिबात सोपं नव्हतं. आमच्याबरोबर इंटिमसी को-ऑर्डिनेटर सेटवर होते, ते आम्हाला हा सीन कसा शूट करायचा हे सांगत होते. पण जेव्हा आम्ही सुहागरातचा पहिला सीन शूट करू लागतो, तेव्हा सिद्धार्थ रडू लागला. तो थरथर कापत होता. त्याने स्वतःला सावरावं, यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो होतो.”

Award Banner

तालीम केल्यावरही रडत होता सिद्धार्थ

या अनुभवाबद्दल बोलताना सिद्धार्थ शॉ म्हणाला, “असं का झाले हे मलाही माहित नाही. कदाचित एक माणूस म्हणून असलेल्या माणुसकीमुळे असं झालं असावं. मी आणि प्रसन्ना एकमेकांना ५ वर्षांपासून ओळखतो आणि आम्ही शूटिंगपूर्वी तालीमही केली होती. हे एखाद्या डान्स स्टेप किंवा कोरिओग्राफीप्रमाणे होतं. आम्ही थेट सीन शूट केला नव्हता. पण तरीही माझी रडणं हीच माझी पहिली प्रतिक्रिया होती आणि मी का रडलो, ते मला समजलं नाही. अनेकदा आयुष्यात काही गोष्टी का घडतात, हे आपल्याला समजत नाही.”

ओटीटीवर ‘चिरैया’चा जलवा

‘चिरैया’ ही वेब सीरिज २० मार्च २०२६ रोजी ‘जिओ हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. यामध्ये दिव्या दत्ता, संजय मिश्रा हे कलाकारही आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थ आणि प्रसन्ना यांच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. या सीरिजमध्ये एकूण ६ भाग आहेत. प्रदर्शित होऊन १४ दिवस उलटल्यानंतरही ही सीरिज आजही ट्रेंडिंग लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.