गेल्या काही दिवसांपासून हॉलीवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं कलाकार मंडळी जोरदार प्रमोशन करत आहेत. ख्रिस्तोफर नोलन हे हॉलीवूडमधील मोठं नाव. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाची क्रेझही तितकीच आहे. त्यांनी आतापर्यंत विविध धाटनीचे चित्रपट दिले आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला त्यांच्या अशा सात चित्रपटांची नावं सांगणार आहोत जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील आणि तुमचं मनोरंजनही करतील. आयएमडीबीवरही या चित्रपटांना चांगले रेटिंग मिळाले आहेत.
द डार्क नाईट (The Dark Knight) – ख्रिस्तोफर नोलन यांच्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी हा एक आहे. या चित्रपटात ब्रूस वेन उर्फ बॅटमॅन (ख्रिश्चन बेल) लेफ्टनंट जेम्स गॉर्डन (गॅरी ओल्डमन) आणि सरकारी वकील हार्वी डेंट (अॅरॉन एकहार्ट) यांच्या मदतीने गोथम शहरातील गुन्हेगारी संपवण्याचा प्रयत्न करतो, पण जोकर (हीथ लेजर) आपल्या धोकादायक डावपेचांनी संपूर्ण शहरात गोंधळ माजवतो. त्यामुळे बॅटमॅनसमोर अनेक कठीण निर्णय घेण्याची वेळ येते. थरारक कथा, उत्कृष्ट अभिनय आणि हीथ लेजरने साकारलेला जोकर यामुळे ‘द डार्क नाईट’ हा जगातील सर्वोत्तम सुपरहिरो चित्रपटांपैकी एक मानला जातो. आयएमडीबीवरही या चित्रपटाला ९.१ इतकं रेटिंग मिळालं असून प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकता.
इन्सेप्शन (Inception) – जर तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि चित्रपट संपल्यानंतरही विचार करायला लावणारा सिनेमा पाहायचा असेल, तर ‘इन्सेप्शन’ नक्की पाहा. हा सायन्स फिक्शन थ्रिलर डॉम कॉब या चोरट्याची कथा सांगतो. लिओनार्डो डिकॅप्रिओ या लोकप्रिय अभिनेत्याने यामध्ये ही भूमिका साकारली आहे. तो एका खास तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांच्या स्वप्नांमध्ये जाऊन त्यांच्या मनातील महत्त्वाची गुपितं चोरतो. मात्र, यावेळी त्याला गुपित चोरायचं नसतं, तर एका मोठ्या कंपनीच्या मालकाच्या मनात एक नवी कल्पना रुजवायची असते. हे काम करताना त्याच्या भूतकाळातील आठवणी पुन्हा समोर येतात. त्यामुळे स्वप्न आणि वास्तव यांच्यातील फरक ओळखणं कठीण होतं आणि त्याचं मिशन आणखी गुंतागुंतीचं बनतं. या चित्रपटात जोसेफ गॉर्डन-लेविट, केन वतानाबे, सिलियन मर्फी आणि मॅरियन कोटिलार्ड यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आयएमडीबीवर या चित्रपटाला ८.८ इतकं रेटिंग मिळालं आहे. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहता येईल.
इंटरस्टेलर (Interstellar) – ख्रिस्तोफर नोलन यांचा हा सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. पृथ्वीवर अन्नटंचाई आणि पर्यावरणाचं संकट वाढत असताना, माणसांच्या भविष्यासाठी नवीन राहण्यायोग्य ग्रह शोधण्याची मोहीम हाती घेतली जाते. या मोहिमेचं नेतृत्व माजी नासा वैमानिक कूपर (मॅथ्यू मॅककोनहे) करतो. तो आपल्या सहकाऱ्यांसह अंतराळातील वेगवेगळ्या ग्रहांवर जातो. या प्रवासात त्याला वेळ, गुरुत्वाकर्षण आणि अवकाशाशी संबंधित अनेक अनोख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. विज्ञान, भावना आणि कुटुंब यांची सुंदर सांगड घालणारा ‘इंटरस्टेलर’ हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. मॅथ्यू मॅककोनहे, अॅन हॅथवे, जेसिका चॅस्टेन आणि मायकेल केन यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. IMDB वर या चित्रपटाला८.७ इतकं रेटिंग आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
द प्रेस्टिज (The Prestige) – ‘द प्रेस्टिज’ हा चित्रपट लेखक ख्रिस्तोफर प्रीस्ट यांच्या कादंबरीवर आधारित आहे. ही कथा लंडनमधील दोन जादूगारांची आहे. या दोघांच्या भूमिका ख्रिश्चन बेल आणि ह्यू जॅकमन यांनी साकारल्या आहेत. दोघेही एकमेकांपेक्षा अधिक श्रेष्ट जादूगार होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्यातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जाते. एकमेकांना हरवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार होतात. अनेक धक्कादायक वळणं, रहस्य आणि वेगळी कथा यामुळे ‘द प्रेस्टिज’ हा ख्रिस्तोफर नोलन यांच्या सर्वोत्तम, पण तुलनेने कमी चर्चेत राहिलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. IMBD वर या चित्रपटाला ८.५ इतकं रेटिंग असून हा चित्रपट प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूबवर पाहू शकता.
द डार्क नाईट रायझेस (The Dark Knight Rises) – ‘द डार्क नाईट रायझेस’ हा ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘द डार्क नाईट’ ट्रीलॉजीमधील शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटात ब्रूस वेन उर्फ बॅटमॅन (ख्रिश्चन बेल) अनेक वर्षांनी पुन्हा गोथम शहराला वाचवण्यासाठी मैदानात उतरतो. कारण बेन (टॉम हार्डी) हा धोकादायक खलनायक शहराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असतो. बेनचा सामना करण्यासाठी बॅटमॅनला अनेक अडचणींवर मात करावी लागते. शहराला वाचवण्यासाठी तो शेवटची मोठी लढाई लढतो. थरारक अॅक्शन, दमदार कथा आणि भावनिक प्रसंग यामुळे ‘द डार्क नाईट रायझेस’ हा सुपरहिरोवर आधारित चित्रपटांमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. आयएमडीबीवर या चित्रपटाला ८.४ रेटिंग मिळालं असून तो प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
मेमेंटो (Memento) – मेमेंटो हा ख्रिस्तोफर नोलन यांना वेगळी ओळख मिळवून देणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाची कथा अतिशय वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. चित्रपटात दोन वेगवेगळ्या वेळेतील घटना दाखवल्या आहेत. त्यामुळे कथा पुढे जात असताना अनेक रहस्यं उलगडत जातात. या चित्रपटात लिओनार्ड शेल्बी (गाय पिअर्स-Guy Pearce) या व्यक्तीची कथा आहे. त्याला नवीन गोष्टी लक्षात ठेवण्याचा आजार असतो. त्यामुळे पत्नीच्या खुनासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीचा तो शोध घेत असतो. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथेमुळे ‘मेमेंटो’ हा ख्रिस्तोफर नोलन यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. आयएमडीबीवर ८.४ इतकी रेटिंग असलेला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
ओपेनहायमर (Oppenheimer) – ‘ओपेनहायमर’ हा ख्रिस्तोफर नोलन यांचा सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह एकूण सात अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटात अभिनेता सिलियन मर्फीने जे. रॉबर्ट ओपेनहायमर या शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जगातील पहिला अणुबॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. हा चित्रपट फक्त त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगत नाही, तर अणुबॉम्ब तयार केल्यानंतर त्यांना आलेले नैतिक प्रश्न, राजकीय वाद आणि त्याचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर झालेला परिणामही दाखवतो. आयएमडीबीवर या चित्रपटाला ८.२ रेटिंग मिळालं असून तो जिओ हॉटस्टारवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
