गेल्या काही महिन्यांत ओटीटी माध्यमांवर वेगवेगळ्या आशयाच्या आणि नेहमीपेक्षा हटके अशा सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. काही लोक या सीरिज ‘बिंज वॉच’ करतात तर, काहीजण फक्त आवड म्हणून कधी-कधी या सीरिज पाहतात. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सभा, राज्याचं कामकाज, अधिवेशन, दौरे असं त्यांचं संपूर्ण व्यग्र शेड्यूल असूनही कधी वेळ मिळाल्यास प्रवासादरम्यान यातील काही निवडक वेब सीरिज पाहतात. यासह ‘इंडियन आयडल’ हा गाण्याचा कार्यक्रम पाहणंही ते पसंत करतात. त्यांनी पहिल्यांदाच याबाबत खुलासा केला आहे.

‘मुंबई तक’च्या कार्यक्रमात याबाबत सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्या मी प्रवासादरम्यान ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रम पाहतो. मी ‘इंडियन आयडल’ डाऊनलोड करून ठेवलंय, त्यातील गाणी ऐकतो.”

“याशिवाय मी सीरिज सुद्धा पाहतो, दोन-तीन अशा चांगल्या सीरिज आहेत. सध्या नेटफ्लिक्सवर जी ‘द ब्लॅकलिस्ट’ सीरिज आहे ती मी डाऊनलोड करून ठेवलीये, ती मी पाहतोय.” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रवासात जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हाच अशा सीरिज बघत असल्याचं त्यांनी सांगितलं.

The Blacklist ही एक लोकप्रिय अमेरिकन क्राइम-थ्रिलर मालिका आहे. या सीरिजचे २०१३ ते २०२३ या काळात एकूण १० सीझन आणि २१८ भाग प्रदर्शित झाले आहेत. नेटफ्लिक्सवरील ही सर्वाधिक लोकप्रिय सीरिज आहे. रेमंड रेडिंग्टन ( रेड ) या सीरिजमधील महत्त्वाचं पात्र आहे. रेड एफबीआयला जगभरातील धोकादायक गुन्हेगार, दहशतवादी आणि माफिया टोळ्यांना पकडण्यासाठी मदत करतो. त्याच्याकडे अशा गुन्हेगारांची एक गुप्त यादी आहे, यालाच “द ब्लॅकलिस्ट” म्हटलं जातं. या संपूर्ण कथानकात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळतील.

दरम्यान, अलीकडच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना त्यांच्या लेकीला राजकारणात रस आहे का? ती राजकारणाबाबत तिचं मत मांडते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “फार ती याविषयी बोलत नाही…पण, एखादी समस्या असेल तर निश्चितच ती माझ्याशी चर्चा करते किंवा तिचं जे काही मत आहे ते सांगते. मुळात कशात करिअर करायचं हा दिविजाचा निर्णय आहे. मला खरंच असं वाटत नाही की ती राजकारणात येईल. तिला वकील व्हायचंय आणि यासाठी तिने तयारी सुरू केलीये. तिच्या जीवनात तिला काय करायचंय हे तिने ठरवलं पाहिजे. जर तिला कधी राजकारणात यायची इच्छा झाली तर, तिने माझ्या भरवशावर राजकारणात येऊ नये. मी तिला राजकारणात आणणार नाही आणि मी तिला मदत करणार नाही.”