सध्या ओटीटीवर कॉमेडी, ड्रामा, सस्पेन्स अन् क्राइम थ्रिलरचा भडिमार पाहायला मिळतो. पण जर तुम्हाला रहस्य आणि गुन्हेगारी जगतावर आधारित थरारक कथा पाहायला आवडत असतील, तर ‘क्राइम बीट’ ही सीरिज तुमच्यासाठी एकदम परफेक्ट चॉइस आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘द प्राइस यू पे’ या प्रसिद्ध कादंबरीवर ही सीरिज आधारित आहे. पत्रकारिता, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील भयंकर साटंलोटं यात अगदी बारकाईने मांडलं आहे.

काय आहे ‘क्राइम बीट’ची रंजक कथा?

या सीरिजमध्ये अभिनेता साकिब सलीमने ‘अभिषेक सिन्हा’ या महत्त्वाकांक्षी पत्रकाराची भूमिका साकारली आहे. एका छोट्या शहरातून आलेला हा क्राइम रिपोर्टर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी दिल्ली गाठतो. पण, त्याच्या हाती एक अशी बातमी लागते जी त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार झालेला धोकादायक गँगस्टर ‘बिन्नी चौधरी’ परत आल्याचा सुगावा त्याला लागतो आणि तिथूनच त्याच्या करिअरमध्ये एक भयंकर अन् नाट्यमय वळण येतं.

‘क्राइम बीट’ हा एक असा शो आहे, ज्यातील प्रत्येक एपिसोडमधील जबरदस्त ट्विस्ट अन् टर्न्स तुमची उत्सुकता ताणून ठेवतात. बातमीच्या शोधात असलेल्या पत्रकारांना प्रत्यक्ष आयुष्यात कोणत्या जीवघेण्या आणि खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागते, याचे वास्तववादी चित्रण यात पाहायला मिळते. ही सीरिज पाहताना तुमची नजर स्क्रीनवरून हटणारच नाही.

तगडी स्टारकास्ट अन् कलाकारांचा दमदार अभिनय

या सीरिजची स्टारकास्ट अत्यंत तगडी आहे. साकिब सलीमसोबतच मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, सबा आझाद, आदिनाथ कोठारे, दानिश हुसेन, विपिन शर्मा आणि राजेश तैलंग यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज यात आहे. मुख्य म्हणजे, राहुल भट्टने साकारलेला व्हिलन प्रेक्षकांना फार आवडला होता.

कुठे पाहायची क्राइम बीट सीरिज?

क्राइम बीट ही ८ एपिसोड्सची सीरिज आहे. ती तुम्ही झी5 वर पाहू शकता. वीकेंडला जर तुम्ही बोअर होत असाल आणि तुम्हाला क्राइम मिस्ट्री आवडत असेल, तर तुम्ही ही सीरिज झी५ वर पाहू शकता. ही सीरिज हिंदी भाषेत उपलब्ध आहे. ‘क्राइम बीट’ सीरिजला आयएमडीबीवर ६ रेटिंग मिळाले आहे.

सबा आझाद व साकिबने आधी एकत्र केलंय काम

दरम्यान, साकिब सलीम आणि सबा आझाद यांनी यापूर्वी २०११ मध्ये आलेल्या ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटातून या दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. साकिब आणि सबा यांच्यात उत्तम बाँडिंग आहे आणि त्यांची ही केमिस्ट्री पडद्यावरही दिसते. तुम्ही ही सीरिज पाहिली नसेल तर या वीकेंडला नक्की पाहू शकता.