समीर जावळे
Criminal Justice Review : पूर्व दिशेने सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हे शाश्वत सत्य. माणसाचं आयुष्यंही अशाच काही ‘सत्य’ गोष्टींनी बांधलेलं असतं त्यात कधीही बदल होत नाही. पण काही काही अशाश्वत, अनालकनीय अशी सत्यंही असतातच. ती लवकर उजेडात येत नाहीत. आली की वाटतं अरे.. हा विचार तर आपण केलाच नव्हता. हे सगळं मनात झरझर येत जातं जेव्हा आपण जियो हॉट स्टारवर आलेल्या क्रिमिनिल जस्टिस या वेब सीरिजचा चौथा सिझन पाहतो. क्रिमिनिल जस्टिस- अ फॅमिली मॅटर असं या चौथ्या सिझनचं नाव आहे जे नाव त्याला अगदी समर्पक आहे. २९ मे ते ३ जुलै या कालवाधीत या वेबसीरिजचे भाग दर गुरुवारी प्रदर्शित होत राहिले आहेत. ३ जुलैला ही सीरिज संपली. ‘सत्य’ हा प्रकार किती पापुद्रे घेऊन आपल्या मनात लपलेला असतो याचं प्रत्यंतर म्हणजे ही वेब सीरिज.
क्रिमिनल जस्टिसच्या चौथ्या सीरिजचं कथानक काय?
मुंबईतला एक प्रतिथयश सर्जन आहे ज्याचं नाव आहे डॉ. राज नागपाल. उच्चभ्रू त्याची आई, मुलगी आणि पत्नी असं चौकोनी कुटुंब आहे. या कुटुंबातून त्याची पत्नी म्हणजेच अंजू आणि डॉ. राज नागपाल दोघंही विभक्त झाले आहेत. रुढार्थाने घटस्फोट नाही. पण पटत नसल्याने वेगळे झाले आहेत. राज आणि अंजू यांची मुलगी इराला एक आजार आहे तो असा आहे की त्यासाठी तिला एक केअर टेकर हवीच आहे. ते काम करण्यासाठी तिच्या आयुष्यात रोशनी सलुजा येते. नंतर ती डॉ. राजचीही प्रेयसी होते. पण पुढे अशा काही घटना घडतात की दोघांमध्ये खटके उडू लागतात. एक पार्टी असते त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला राज नागपाल आणि त्याच्या कुशीत रक्ताने माखलेली रोशनी दिसते. तिच्या गळ्यावर वार झालेला असतो आणि वाचण्यासाठी तडफड करत असते. तितक्यात अंजू तिथे येते आणि तिला राज फक्त Help इतकंच म्हणतो. ती पोलिसांना फोन करते आणि पोलीस प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे डॉ. राज नागपालला रोशनीच्या हत्या प्रकरणात अटक करतात. पुढे काय घडतं? रोशनीची हत्या कुणी केलेली असते? अंजूला अटक का होते? दोघांवर खटला का चालतो? या सगळ्याची उत्तरं आपल्याला सीरीज पाहिल्यावरच मिळतील.
कलाकारांचा अभिनय कसा आहे?
या वेब सीरिजच्या चौथ्या सिझनमध्ये मोहम्मद झिशान अय्युबने डॉ. राज नागपाल हे पात्र साकारलं आहे. एक प्रतिथयश सर्जन, एक प्रियकर, खुनाच्या आरोपातील आरोपी या सगळ्या शेड्स त्याने खुबीने रंगवल्या आहेत. सरकारी वकिलाच्या भूमिकेत श्वेता बासू प्रसाद आहे तिनेही ही भूमिका उत्तम केली आहे. पंकज त्रिपाठी हा माणूस फक्त अभिनेता नाही तर अवलिया आहे. त्याला कुठल्याही भूमिकेत पाहणं ही पर्वणीच असते. ‘माधव मिश्रा’ त्याच्याइतका कुणी जिवंत करुच शकत नाही. सुरुवातीच्या सिझन्समध्येही तोच आहे. काहीसा अजागळ वाटणारा पण निष्णात असलेला माधव या सिझनमध्ये कमालीचा सफाईने वावरताना दिसतो. गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर अनुभवसंपन्न होण्याचे भाव पंकज त्रिपाठीने चपखल आणले आहेत. शिवाय त्याच्या निरीक्षण शक्तीचीही आपल्याला कमाल वाटते. मिता वसिष्ठ, कल्याणी मुळे यांनीही त्यांची जबाबदारी चोख पार पाडली आहे. चेरी ऑन द केक असं वर्णन करता येईल ते म्हणजे सुरवीन चावलाचं. सुरवीन चावलाने साकारलेली अंजू आपल्याला खूप भावते. एक आई, विभक्त झालेली पत्नी, न्याय मागणारी स्त्री, मुलीच्या आजारामुळे वकिली सोडून देणारी स्त्री, पतीचं प्रेमप्रकरण माहीत असूनही ते शांतपणे सोसत राहणारी स्त्री या सगळ्या प्रसंगांमध्ये एखादी स्थितप्रज्ञ स्त्री जशी उभी राहिल तशी ती उभी राहिली आहे. अंजू अर्थात सुरवीन चावलाला या भूमिकेत पाहणं हे माधव मिश्राला पाहण्याइतकंच सुखावह आहे. आशा नेगीने साकारलेली रोशनीही चांगली जमली आहे.

वेब सीरिजच्या चौथ्या सिझनची खासियत काय?
वेब सीरिजचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपल्याला सीरिजमध्ये गुंतवून ठेवण्याची ताकद. आठ भागांमध्ये आपण पुढे काय होत राहिल? यामध्ये गुंतून राहतो. शिवाय सात भागांपर्यंतचे सगळेच भाग साधारण ४० ते ४५ मिनिटांचे आहेत. पण शेवटचा भाग म्हणजेच आठवा भाग ५२ मिनिटांचा आहे. कोर्टात केस सुरु असते, माधव मिश्रा हरेल की काय असं सातव्या भागापर्यंत वाटत राहतं. तरीही तो एक असा धागा शोधून काढतो जो दुर्लक्षित राहिलेला असतो. त्या धाग्यानंतर पुढे जे घडतं ते आठव्या भागात आहेच. पण आठव्या भागातही पहिल्या ३२ मिनिटांत वगैरे सत्य समोर येतंच. पुढची २० मिनिटं का? असं वाटतं पण तेही अगदी एकच क्षण. आपण जे शोधत असतो ते माधव मिश्राला समजतं आणि आपण चक्रावून जातो. समोर आलेलं सत्य, समजलेलं सत्य आणि त्यानंतर पुन्हा एकदा समोर आलेलं सत्य या सगळ्याचा रंजक प्रवास म्हणजे हा आठवा भाग. शेवटी जे सत्य समोर येतं त्यामुळे माधव मिश्राची हुशारी पुन्हा एकदा सिद्ध होते यात शंकाच नाही.
क्रिमिनिल जस्टिसच्या चारही सिझनपैकी बेस्ट सिझन
क्रिमिनल जस्टिसचे चार सिझन आत्तापर्यंत आले आहेत. त्यातला हा उत्कृष्ट सिझन आहे यात काहीही शंका नाही. रोहन सिप्पी यांनी या सिझनचं दिग्दर्शन केलं आहे. हरमन वडाला, राहुल वेद प्रकाश, वर्षा रामचंद्रन आणि रिया पुजारी यांनी चौथ्या सिझनची रंजक गोष्ट लिहिली आहे. तर हरमन, संदीप जैन आणि समीर मिश्रा यांनी या वेब सीरिजचे खास संवाद लिहिले आहेत. “किसी को भी झूठ पे विश्वास दिलाने का सबसे अच्छा तरीका उसे बताना नहीं दिखाना होता है. जिसे आप तमाशा कह रहें है वो बस एक तरीका था. जब वक्त कम होता है तो सिर्फ उम्मीद से काम नहीं चलता.” हा संवाद तसंच “जिंदगी से बडी कोई सजा नहीं और जुर्म क्या है पता ही नहीं. जिंदगी नहीं मौत ही तेरी मंजिल है, दुसरा कोई रास्ता ही नहीं.” हा संवाद अगदीच खास आहेत. यात या सिझनचं अख्खं सार सामावलं आहे.