OTT Release Of This Week : नोव्हेंबर महिन्यातील पहिला आठवडा वेब सीरिजप्रेमींसाठी खूप खास ठरला होता. कारण- गेल्या आठड्यात ओटीटीवर एकापेक्षा एक अशा सीरिज प्रदर्शित झाल्या. त्यामध्ये ‘महारानी ४’ ते ‘बारामुला’ यांचाही समावेश आहे.

या महिन्यातील पहिल्या आठवड्यात एकापेक्षा एक असे चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित झाल्या. त्यामुळे आता दुसऱ्या आठवड्यात कोणत्या कलाकृती पाहायला मिळणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तर या आठवड्यात सस्पेन्स, क्राइम आणि थ्रिलर असलेले भरपूर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणते आहेत ते चित्रपट आणि वेब सीरिज.

या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट व सीरिज

दिल्ली क्राइम सीझन ३ – यापूर्वीचे दोन सीझन हिट ठरल्यानंतर आता ‘दिल्ली क्राइम ३’ हा सीझन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही सीरिज १३ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

अविहितम ( Avihitham) -हिंदीबरोबरच या आठवड्यात दाक्षिणात्य चित्रपटही पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘अविहितम’ हा चित्रपट. हा एक मल्याळी चित्रपट आहे. ही केरळमधील एका गावातील गोष्ट आहे. चित्रपटातील एक माणूस, जो त्याच्या मित्रांबरोबर फिरायला जातो आणि जेव्हा तो घरी परततो तेव्हा त्याच्याबरोबर असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘जिओ हॉटस्टार’वर हा चित्रपट तुम्हाला पाहता येईल.

दशावतार – सुबोध खनोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्यामध्ये दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन हे कलाकार पाहायला मिळतात. मोठ्या पद्यावर प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाल्यानंतर हा चित्रपट आता १४ नोव्हेंबरपासून ‘जिओ हॉटस्टार’वर पाहता येणार आहे.

जॉली एलएलबी ३ – अक्षय कुमार व अर्शद वारसी याच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता कोर्ट रूम ड्रामा असलेला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. १४ नोव्हेंबरपासून हा चित्रपट एक नाही, तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. ‘जॉली एलएलबी ३’ हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे.

Inspection Bunglow – ‘इन्स्पेक्शन बंगला’ एक सीरिज आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना हॉरर, सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडकाही पाहायला मिळणार आहे. या सीरिजची कथा सामान्य सबइन्स्पेक्टर शबरीश वर्माच्या अवतीभोवती फिरते. ज्याला पोलिस चौकीचं रूपांतर सरकारी बंगल्यात करण्याचं काम मिळतं. १४ नोव्हेंबरपासून ही सीरिज ‘झी ५’वर तुम्ही पाहू शकता.

निशांची – अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’ हा चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता; परंतु त्याला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तर, आता १४ नोव्हेंबरपासून ‘प्राइम व्हिडीओ’वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.