दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत व जोसेफ विजय यांच्या ‘कुली’ आणि ‘लिओ’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय दिग्दर्शक लोकेश कनगराज यांनी ‘डीसी’ चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अरुण मथेश्वरन दिग्दर्शित या अॅक्शन चित्रपटाने जगभरात १०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत या वर्षातील सर्वाधिक गल्ला जमावणाऱ्या तमिळ चित्रपटांपैकी एक ठरला.
‘डिसी’ या चित्रपटात लोकेश कनगराज यांच्याबरोबर बॉलीवूड अभिनेत्री वामिका गब्बीसुद्धा मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकली. त्यांच्या या चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. ओटीटीवर हा चित्रपट कधी व कुठे पाहता येईल जाणून घेऊया.
‘डीसी’ ओटीटीवर कधी आणि कुठे होणार रिलीज?
१२३ तेलुगूच्या रिपोर्टनुसार, ‘डीसी’ ४ सप्टेंबरपासून ओटीटीवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स सन एनएक्सटीने मिळवल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट प्राइम व्हिडीओवरही एकाच वेळी रिलीज होऊ शकतो. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ‘डीसी’चा तमिळ आणि तेलुगू व्हर्जन ४ सप्टेंबरला ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. तर चित्रपट हिंदी भाषेत २ ऑक्टोबरपासून स्ट्रीम होण्याची शक्यता आहे. मात्र, रिलीज डेट आणि प्लॅटफॉर्मबाबत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
लोकेश कनगराज आणि वामिका गब्बी यांच्या ‘डीसी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४१.९० कोटी रुपये, तर दुसऱ्या आठवड्यात १९.५९ कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाने ६.१५ कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या चौथ्या शुक्रवारी म्हणजेच २२व्या दिवशी ‘डीसी’ने २५ लाख रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाची भारतातील २२ दिवसांची एकूण नेट कमाई ६७.८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पाही पार केला आहे.
‘डीसी’ची स्टारकास्ट
‘डीसी’मध्ये लोकेश कनगराज यांच्याबरोबर वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहे. तसेच संजना कृष्णमूर्ती यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या अॅक्शन चित्रपटाचं दिग्दर्शन अरुण मथेश्वरन यांनी केलं असून सिन पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
