ओटीटीवर प्रदर्शित झालेली एक नवीन मिस्ट्री आणि हॉरर थ्रिलर सीरिज सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधील काही दृश्यं पाहून प्रेक्षकांच्याही अंगावर काटा येत आहे. एका बेरोजगार तरुणाची ही कथा आहे. तो कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना अचानक त्याला सध्याच्या पगाराच्या तब्बल ५० पट अधिक पगाराची नोकरी मिळते. मात्र, या नोकरीमागे नेमकं काय रहस्य दडलं आहे, हेच या सीरिजमध्ये पाहायला मिळतं.
रहस्य आणि भीतीने भरलेली सीरिज
मात्र, ५० पट अधिक पगार मिळाल्याचा आनंद काही मिनिटांतच त्याच्यासाठी सर्वात भयानक स्वप्न ठरतं. ही आठ भागांची सीरिज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दाखवण्यात आली होती. या सीरिजला प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही चांगली पसंती मिळत आहे. या सीरिजचं नाव आहे ‘डेड-एंड जॉब’ (Dead-End Job). ‘जागरण’च्या वृत्तानुसार ही एक साऊथ कोरियन मिस्ट्री हॉरर थ्रिलर सीरिज आहे. आठ भागांच्या या के-ड्रामाचं (K-Drama) प्रदर्शन सर्वप्रथम ३१व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालं होतं. त्यावेळी या सीरिजचे एकूण चार भाग दाखवण्यात आले होते. या भागांना प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगली दाद मिळाली होती. आता ही सीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. ३० ऑक्टोबरपासून ही सीरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाली आहे.
सीरिजला मिळाली उत्तम रेटिंग
अवघ्या एका दिवसात ‘डेड-एंड जॉब’ (Dead-End Job) या सीरिजने नेटफ्लिक्सच्या टॉप १० ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत पाचवं स्थान पटकावलं आहे. IMDb वरही या सीरिजला १० पैकी ७.६ रेटिंग मिळाली आहे. या सीरिजमध्ये ली जे-वूक (Lee Jae-wook), गो मिन-सी (Go Min-si) आणि किम मिन-हा (Kim Min-ha) यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
काय आहे सीरिजची कथा?
या सीरिजची कथा ह्युक-जुन (ली जे-वूक) या तरुणाभोवती फिरते. त्याला एका रहस्यमयी जॉब एजन्सीबद्दल माहिती मिळते. ही एजन्सी पार्ट टाइम कामासाठी नेहमीच्या पगाराच्या तब्बल ५० पट अधिक पगार देत असते. वाढत्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी ह्युक-जुन या गुप्त नोकरीसाठी तयार होतो. सुरुवातीला ही नोकरी त्याच्यासाठी मोठी संधी वाटते. मात्र, काही वेळातच त्याचं रूपांतर एका भयानक स्वप्नात होतं. त्यानंतर तो अशा एका भयावह ठिकाणी पोहोचतो, जिथे जाण्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसते.
