Netflix Trending Film : दर शुक्रवारी सिनेमागृहांमध्ये व ओटीटीवर नवनवीन चित्रपट रिलीज होत असतात. त्यामुळे चाहते शुक्रवारची आतुरतेने वाट पाहत असतात. मनोरंजनासाठी नवीन चित्रपट आणि सीरिज शोधणाऱ्यांसाठी शुक्रवार हा एक खास दिवस असतो. ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे. हा चित्रपट भारतात ट्रेंडिंग आहे. या २ तास १ मिनिटांच्या चित्रपटाबद्दल आपण जाणून घेऊयात.

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव ‘डेथ व्हिस्परर’ आहे. मूळ थाई भाषेत याला ‘टी योड’ (Tee Yod) असे म्हटले जाते. हा चित्रपट थायलंडमधील एका सत्य घटनेवर आणि त्याच नावाच्या लोकप्रिय कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने २०२३-२४ मध्ये आशियाई चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घातला होता. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो ट्रेंडिंग आहे.

‘डेथ व्हिस्परर’ चित्रपटाची कथा

चित्रपटाची कथा १९७२ मधील कांचनाबुरी प्रांतातील एका दुर्गम गावात घडते. एका शेतकरी कुटुंबातील सहा भावंडांपैकी याम नावाची मुलगी अचानक एका विचित्र आजाराने ग्रासली जाते. शाळेतून घरी परतताना तिने आणि तिच्या बहिणींनी एका झाडाखाली एका काळ्या कपड्यातील महिलेला पाहिलं असतं. यानंतर यामचं वागणं पूर्णपणे बदलतं. तिला रात्री विचित्र आवाज ऐकू येतात (ज्याला ‘टी योड’ असे म्हटले जाते) आणि ती झपाटल्यासारखी वागू लागते. तिचा मोठा भाऊ याक (Yak), जो एक माजी सैनिक आहे, आपल्या बहिणीला या संकटातून वाचवण्यासाठी आणि त्या दुष्ट आत्म्याचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करतो.

चित्रपटाचं दिग्दर्शन तावीवत वंथाने केलं आहे. प्रसिद्ध थाई अभिनेता नाडेच कुगिमिया (Nadech Kugimiya) याने ‘याक’ची दमदार भूमिका साकारली आहे. त्याच्याबरोबर डेनिस जेलिल्चा कापुनसह इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कमाई करणारा हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाने थाई बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आणि नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगभरात प्रसिद्धी मिळवली. याच्या प्रचंड यशामुळे याचा दुसरा भाग (Death Whisperer 2) देखील प्रदर्शित झाला आहे आणि तिसरा भाग (२०२६) मध्ये अपेक्षित आहे.

नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे चित्रपट

या वीकेंडला काय पाहावं, असा विचार तुम्ही करत असाल तर हा चित्रपट पाहू शकता. खासकरून ज्यांना हॉरर चित्रपट आवडतात, त्यांच्यासाठी ही एक उत्तम पर्वणी ठरू शकते. सोशल मीडियावरही युजर्स या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. पण जर तुम्ही हा चित्रपट एकट्याने पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भीती वाटू शकते. भयपट एकट्याने पाहायची सवय नसेल तर हा चित्रपट कुणीतरी सोबत असताना बघा. कारण त्यातील ट्विस्ट, सीन बघून तुम्ही घाबरून जाल एवढं मात्र नक्की.