Deool Band 2 OTT Release : प्रवीण तरडेंच्या ‘देऊळबंद २’ सिनेमाने यंदा बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. हा चित्रपट २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पुढचे ५० दिवस या सिनेमाचे शो थिएटरमध्ये हाऊसफुल्ल सुरू होते. बघता-बघता ‘देऊळबंद २’ने जगभरात १०० कोटींचा गल्ला जमवला आणि प्रवीण तरडेंसह सिनेमाच्या संपूर्ण टीमवर मनोरंजनसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.
‘देऊळबंद २’ सिनेमाचे अगदी रात्री ११ वाजताचे अन् पहाटेचे शो सुद्धा महाराष्ट्रात हाऊसफुल्ल होते. त्यामुळे या दिवसांत जर कुणी ‘देऊळबंद २’ पाहिला नसेल तर, अशा सगळ्या प्रेक्षकांसाठी प्रवीण तरडेंनी आनंदाची बातमी शेअर केली आहे. हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
‘देऊळबंद २’ सिनेमा प्रेक्षकांना अमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) घरबसल्या पाहता येणार आहे. याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत प्रवीण तरडेंनी माहिती दिली आहे.
प्रवीण तरडे लिहितात, “आपला ‘देऊळबंद २’ सिनेमा अमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) पाहता येणार आहे. ज्यांनी ज्यांनी अजूनही सिनेमा पाहिला नाही त्यांनी नक्की बघा आणि ज्यांनी पाहिलाय त्यांनी पुन्हा-पुन्हा बघा .. कारण कितीही वेळा पाहीला तरी पोट भरणार नाही आणि डोळ्यातलं पाणीही थांबणार नाही..”
दरम्यान, ‘देऊळबंद २’ मध्ये मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता या सिनेमाच्या यशानंतर प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न २’ सिनेमाच्या शूटिंगकडे वळणार आहेत. आता हा सिनेमा केव्हा भेटीला येणार, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
