Devkhel 2 Series : प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असलेली थरारक ‘देवखेळ’ सीरिज जानेवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कोकणातील गावात शिमगोत्सवात शंकासूर येतो. पण, यानंतर गावात काय-काय घडामोडी घडतात आणि शेवटी इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे खऱ्या खुन्याला कसा पकडतो याची थ्रिलर कथा या सीरिजमध्ये पाहायला मिळते. ‘देवखेळ’ मध्ये देवतळी या काल्पनिक गावातील कथा दाखवण्यात आली होती. आता या सीरिजच्या दुसऱ्या भागाची घोषणा Zee 5 कडून करण्यात आली आहे.

अभिनेता अंकुश चौधरीने या ‘देवखेळ’ सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं होतं आणि त्याच्यासह यामध्ये झळकली होती लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी. शांत, समजूतदार अशा सारिका निमकरची भूमिका तिने साकारली होती. विश्वास आणि सारिका यांची आधीपासून ओळख असते. पण, घरच्यांमुळे सारिकाला वेगळ्याच मुलाशी लग्न करावं लागतं. तो तिचा छळ करत असतो…त्यामुळे सुरुवातीला सारिकानेच नवऱ्याचा खून केला नाही ना? असा संशय विश्वासला देखील तिच्यावर असतो. पण, शेवटी खऱ्या किलरचं नाव सर्वांसमोर उघड होतं.

आता ‘देवखेळ २’ सीरिजचा नवीन टीझर पाहिल्यावर विश्वास-सारिकाचं लग्न झाल्याची हिंट मिळतेय. तो सारिकाला मंदिरात यायला सांगतो…याठिकाणी विश्वासची टीम आधीपासूनच उपस्थित असते. अचानक विश्वासला एका माणसाची जोरात किंकाळी ऐकू येते आणि तो त्या दिशेने पळत जातो. यावेळी समोरचं दृश्य पाहून विश्वासला धक्का बसतो.

सारिकाच्या हातात रक्ताने माखलेला कोयता, चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि नंतर विश्वासला पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावरची भीती…तिला अशा रुपात पाहून विश्वास सुद्धा चकीत होतो. आता नेमकं काय घडलंय? सारिकाने हा खून केला असल्यास विश्वास तिला शिक्षा देईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर, तिला यामध्ये कुणी फसवलं असेल तर विश्वास सारिकाला निर्दोष कसं ठरवणार असे बरेच प्रश्न टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

दरम्यान, लवकरच Zee 5 कडून ‘देवखेळ २’ सीरिजची लॉन्च डेट जाहीर केली जाईल. प्रेक्षक सुद्धा या सीरिजचा दुसरा भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत.