Devkhel Web Series Controversy: अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘देवखेळ’ ही वेब सीरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सात भागांची ही वेब सीरिज झी ५ या ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे.
३० जानेवारी २०२६ ला प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजमध्ये कोकणातील देवतळी गावातील गोष्ट पाहायला मिळते. देवतळी गावात होळीच्या वेळी शंकासुर पाहायला मिळतो. जो व्यक्ती पाप करतो, त्याला शंकासूर शिक्षा करतो, असे गावातील लोक मानतात. याच गावात विश्वास सरंजामे हा पोलिस इन्स्पेक्टर येतो. श्रद्धेला स्थान असावं, अंधश्रद्धेला नाही असे म्हणत १५ वर्षांपासून दरवर्षी होणाऱ्या खूनामागे नेमके कोण आहे, हे तो शोधून काढतो. आता मात्र देवखेळ वेब सीरिज वादात अडकली असल्याचे दिसत आहे.
“कोकणात रोष वाढत…”
देवखेळ वेब सीरिजमुळे कोकणवासियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोकणात असंतोष निर्माण झाला असून त्यासंबंधी उचित कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फसणवीस यांना लिहिले आहे. याबद्दल त्यांनी एक्सवर देखील पोस्ट शेअर केली आहे.
त्यांनी लिहिले, ‘झी ५ वरील ‘देवखेळ’ या वेब सीरिजमुळे महाराष्ट्र शासन जतन संवर्धन करीत असलेल्या ‘नमन-खेळे’ या पौराणिक व खूप जुन्या हिंदू लोककलेला व परंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. त्या विरोधात कोकणात रोष वाढत असून वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणीने जोर धरला आहे.”
“मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमग्याचा सण काही दिवसांवर आला असताना अशा प्रकारचे गढूळ वातावरण निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी लक्ष द्यावे म्हणून तातडीने लक्ष वेधले आहे.”
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात या लोककलेबद्दल त्यांनी लिहिले की कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नमन खेळे ही अत्यंत लोकप्रिय व पौराणिक लोककला असून सामाजिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली ही हिंदू प्रथा परंपरा जतन करणाऱ्या लोककलेतील एक अग्रगण्य लोककला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदैवतांशी या लोककलेचा थेट संदर्भात असल्याने त्याला धार्मिक दृष्टीने एक पावित्र्य व अधिष्ठान ही प्राप्त झाले आहे.
देवखेळ या वेब सीरिजबद्दल बोलायचे तर ही सात भागांची वेब सीरिज आहे. याचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड यांनी केले आहे. यामध्ये प्राजक्ता माळी, वीणा जामकर , अंकुश चौधरी, अरूण नलावडे, ओंकार भोजने, यतीन कार्येकर, मंगेश देसाई, सायली देवधर, असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

