Dheeraj Dhoopar Lock Upp 2: ‘नेटफ्लिक्स’वरील ‘लॉक अप २’ हा रिअॅलिटी शो सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्पर्धकांचे वाद, त्यांच्या आयुष्यातील गुपितं आणि शोमधील अनपेक्षित घटना यांमुळे प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यातील स्पर्धक धीरज धूपर हा सध्या चर्चेमध्ये आला असून, त्याच्या कुटुंबाच्या भेटीवरून वाद निर्माण झाला आहे. धीरज धूपरला त्याची पत्नी व मुलाची भेट घालून देण्यात आली. मात्र, यावेळी त्याची पत्नी विन्नी अरोराने शोचा नियम तोडण्याचा प्रयत्न करीत त्याला दोन वेळा चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. त्यावरून रितेश देशमुखने नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर विन्नीने या चिठ्ठीमध्ये काय लिहिले होते, याचा खुलासा केला आहे.
धीरज धूपर याचे कुटुंबीय त्याला भेटायला आलेले असताना त्याची पत्नी विन्नी अरोराने त्याला हाताने लिहिलेली छोटी चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा हा प्रयत्न करण्यात आल्याने रितेश देशमुख यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणामुळे धीरज चर्चेमध्ये आला असून, आता या प्रकरणावर त्याची पत्नी विन्नीने उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत तिने असे का केले याचा खुलासा केला आहे. तिची ही तिची भावनिक चूक असल्याचे कबूल केले आहे.
काय म्हणाली विन्नी अरोरा?
विन्नी अरोरा म्हणाली, “ही पोस्ट फक्त आमचा चांगला विचार करणाऱ्या लोकांसाठी आहे. मी पहिल्यांदा आमच्या मुलाला भेटायला जाऊ दिले. कारण- काही दिवसांपासून जैनची प्रकृती चांगली नाही. जेव्हा धीरज ‘लॉक अप’ शोच्या शूटिंगसाठी गेला, तेव्हा त्याचीही तब्येत ठीक नव्हती; पण आम्हाला शोच्या निर्मात्यांना निराश करायचे नव्हते. म्हणून आम्ही त्याची समजूत काढून आणि धीर एकवटून शोसाठी पाठवले होते. जैन अजूनही त्याच्या वडिलांची आठवण काढून रात्रीचा उठत असतो. त्याला अनेकदा ताप येतो आणि तो नीट जेवत नाही. त्यामुळे एक बायको आणि आई म्हणून मी हे असे केले.”
पुढे ती म्हणाली, “आता त्या चिठ्ठीमध्ये काय होते, हे मी स्वतः सांगते. मुलाची तब्येत खराब होत होती आणि धीरजही जाताना आजारी पडला होता. म्हणून मी काळजीनं ती चिठ्ठी लिहिली होती. मला अनेकदा शोमध्ये धीरज थकलेला आणि उदास चेहऱ्यानं बसलेला दिसत होता. त्याच्या डोळ्यांमध्ये थकवा जाणवत होता. आता ही गोष्ट मला जाणवत आहे, हे मी सिद्ध करून दाखवू शकत नाही; पण मला माहीत आहे की, तो आल्यावरही मला हेच सांगणार आहे. त्यामुळे त्याची विचारपूस करणारी ती चिठ्ठी होती. माझ्या जागी कोणतीही स्त्री असती तरी तिनं हेच केलं असतं.”
धीरज धूपरच्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं?
धीरज धूपरला कुटुंबीयाकडून चिठ्ठीमध्ये काय मेसेज लिहिण्यात आला होता हे विन्नीने सांगितले. ती म्हणाली, “त्या चिठ्ठीमध्ये फक्त ‘तुला आता बरं वाटत आहे का? बरं वाटत नसेल तर मला तसा संकेत दे आणि सर्व काही ठीक असेल, तर थोडं अॅक्टिव्ह होऊन गेम खेळ,’ असा मेसेज लिहिला होता. त्यामध्ये कोणतीही बाहेरची गोष्ट किंवा रणनीती सांगितली नव्हती. धीरज कधीच अशा वातावरणामध्ये राहिला नव्हता. त्यामुळे माझ्या हातामध्ये असतं, तर मी लॉक अप तोडून आतमध्ये गेले असते.”
ही माझी भावनिक चूक होती – विन्नी अरोरा
पुढे ती म्हणाली, “धीरज जिंकू किंवा हरू दे, मला काहीच फरक पडणार नाही. कारण- माझ्यासाठी तोच खरा विजेता आहे. तो पूर्ण सन्मान ठेवून चांगला खेळ खेळत आहे. मी काळजी वाटली म्हणून ही चिठ्ठी लिहिल्याचे निर्मात्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी मला फक्त असे न करण्याची ताकीद दिली. पण त्यामध्ये धीरजची कोणतीही चूक नाही. त्याने कोणतीही चीटिंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही खरं तर माझी भावनिक चूक होती.”
