Dhurandhar 2 OTT Release Update: रणवीर सिंहचा स्पाय थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आदित्य धरच्या दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त ओपनिंग केली आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून याचे भरभरून कौतुक होत आहे. एकीकडे चित्रपटगृहांबाहेर गर्दी होत असताना, आता अनेक चाहते हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याची वाट पाहत आहेत.

‘धुरंधर’ थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. पण आता सिक्वेल म्हणजेच धुरंधर २ नेटफ्लिक्सवर येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार धुरंधर २?

यावेळेस निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये बदल केला आहे. पहिला भाग नेटफ्लिक्सवर आला होता, मात्र ‘धुरंधर २’ नेटफ्लिक्सवर नाही तर जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर जिओहॉटस्टारचा लोगो असल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.

Award Banner

धुरंधर २ या चित्रपटाचे डिजिटल हक्क कोट्यवधींमध्ये विकले गेले आहे. खरं तर ही गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी ओटीटी डील मानली जात आहे. धुरंधरचा पहिला भाग नेटफ्लिक्सला ८५ कोटींमध्ये विकला गेला होता. दुसरा भाग मात्र त्याहून दुप्पट किमतीत विकला गेला आहे. धुरंधर २ च्या डिजिटल हक्कांसाठी जिओहॉटस्टारने तब्बल १५० कोटींमध्ये निर्मात्यांशी डील केल्याची माहिती न्यूज १८ ने दिली आहे.

धुरंधर २ ओटीटीवर कधी येणार?

ओटीटी रिलीजच्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, साधारणपणे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसांनी ओटीटीवर येतो. हा चित्रपट १९ मार्चला प्रदर्शित झाला असल्याने, मे महिन्याच्या शेवटी किंवा जून २०२६ च्या सुरुवातीला तो जिओहॉटस्टारवर पाहता येण्याची शक्यता आहे. चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अशीच सुरू राहिली तर ओटीटी रिलीज पुढे ढकलण्यात येऊ शकते.

धुरंधर २ चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

धुरंधर २ ने प्रदर्शनापूर्वीच ‘पेड प्रिव्ह्यू’च्या माध्यमातून या चित्रपटाने ४३ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. जवळपास ४ तासांची लांबी आणि ‘A’ सर्टिफिकेट मिळूनही प्रेक्षकांचा याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांनी या चित्रपटाला ३.५ स्टार रेटिंग दिले आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. पण खऱ्या अर्थाने रणवीर सिंह भाव खाऊन गेला आहे. कलाकारांनी दमदार अभिनय केला असला तरी कथेच्या बाबतीत पहिल्या भागाइतका धुरंधर २ दमदार नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.