Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर’ चित्रपट ५ डिसेंबरला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केल्याचं पाहायला मिळालं. ‘धुरंदर’चं कलेक्शन आता १४०० कोटींच्या घरात जाऊन पोहोचलं आहे. हा स्पाय थ्रिलर सिनेमा जानेवारी महिन्याच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. जे प्रेक्षक ‘धुरंदर’ थिएटरमध्ये पाहू शकले नाहीत किंवा ज्यांना पुन्हा एकदा हा सिनेमा पाहायचाय असे सगळेजण ‘धुरंदर’च्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते.
अखेर ३० जानेवारीला ‘धुरंदर’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘धुरंदर’ जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता त्यावेळी संपूर्ण देशभरात अक्षय खन्नाचा डान्स तुफान गाजला होता. त्याचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं. मात्र, मुख्य भूमिकेत असूनही रणवीरबद्दल फार कुणी बोलत नव्हतं. आता ओटीटी रिलीजनंतर ही परिस्थिती बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
खरा ‘धुरंदर’ कोण?
५ डिसेंबरला ‘धुरंदर’ प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडियावर सर्वत्र अक्षय खन्नाची चर्चा होती. रहेमान डकैतची भूमिका सर्वत्र तुफान गाजली. यामुळे चित्रपटाचा मूळ नायक हमजा अली मजारी ( जसकिरत सिंग रंगी ) याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं होतं. पण, ओटीटी रिलीजनंतर एक्स ( आधीचं ट्विटर ), इन्स्टाग्राम सर्वत्र रणवीर सिंहची चर्चा होतेय. रणवीरचं कौतुक करत चाहत्यांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.
एक युजर लिहितो, “अक्षय खन्ना ‘धुरंदर’ सिनेमात बेस्ट होता हा सर्व पीआर गेम आहे. मला एक टक्केही असं वाटलं नाही. ‘धुरंदर’च्या यशाचं श्रेय रणवीरला मिळालचं पाहिजे.” दुसरा एक युजर लिहितो, “धुरंदर’ सिनेमा नीट पाहिला तर तुम्हाला कळेल रणवीरची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.” अन्य काही युजर म्हणतात, “रणवीरची अभिनय शैली चित्रपट पाहताना सुरुवातीच्या दहा मिनिटांत कळते”, “रणवीर सिंहला तोड नव्हती कमाल अभिनय केलाय त्याने” अशा असंख्य प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत.
दरम्यान, आता १९ मार्च २०२६ रोजी ‘धुरंदर’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता पहिल्या भागात रहेमान डकैतचा मृत्यू झालाय. त्यामुळे दुसऱ्या भागात तो झळकणार की नाही? अक्षय खन्नाचे कोणते सीन्स दुसऱ्या भागात पाहायला मिळतील हे १९ मार्चला स्पष्ट होईल.

