Diljit Dosanjh Satluj Banned on ZEE5 India: प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसंजचा ‘सतलुज’ हा चित्रपट ४ वर्षांच्या अडथळ्यांनंतर २ दिवसांपूर्वी ‘झी५’ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. पण हा चित्रपट आता भारतातील प्रेक्षक पाहू शकणार नाहीत. मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांतच ओटीटीवरून हटवण्यात आला आहे.

रविवारी ‘झी५’ च्या सोशल मीडियावर एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आली. “सध्याच्या काही घडामोडींमुळे ‘सतलुज’ हा चित्रपट पुढील आदेश येईपर्यंत भारतात उपलब्ध नसेल. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हा चित्रपट लवकरात लवकर पुन्हा आमच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.

‘सतलुज’ या चित्रपटाचं दिग्दर्शन हनी त्रेहान यांनी केलंय. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसव्हीपी आणि मॅकगफिन पिक्चर्सने त्याची निर्मिती केली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीच्या वादात जवळपास चार वर्षे अडकल्यानंतर अखेर ३ जुलै रोजी हा चित्रपट झी५ वर रिलीज करण्यात आला होता. दरम्यान, हा चित्रपट नेमका का हटवण्यात आला, त्यामागचं कारण अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

बंदीवर सतलुजच्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

विशेष म्हणजे भारतात या चित्रपटावर बंदी घालण्यात आली असली, तरी विदेशात राहणारे प्रेक्षक ‘झी५ ग्लोबल’ (ZEE5 Global) या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट अजूनही पाहू शकतात. “रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास मला समजलं की भारतात झी५ वरून ‘सतलुज’ चित्रपट हटवण्यात आला आहे. या अचानक झालेल्या बदलाबद्दल मला काय बोलावे ते सुचत नाहीये आणि मी सध्या खूप हताश झालो आहे,” असं दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं.

‘झी५’ने सतलुज चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार मानले. “आम्ही ‘सतलुज’ चित्रपट आणि त्यामागील क्रिएटिव्ह विचारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. एका दमदार कथेत लोकांना प्रेरित करण्याची आणि त्यांच्या मनावर प्रभाव टाकण्याची ताकद असते, असा आम्हाला विश्वास आहे. खऱ्या आणि अर्थपूर्ण कथांना पुढे आणण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू.”

अभिनेता दिलजीत दोसांझने चित्रपट हटवण्याबद्दल भीती व्यक्त केली होती. “हा चित्रपट ओटीटी हटवला जाऊ शकतो अशी एक भीती होतीच. मला वाटतं की तुम्ही लोकांनी आतापर्यंत हा चित्रपट डाऊनलोड केलाच असेल. त्यामुळे आता काळजी करण्याची काही गरज नाही,” असं तो म्हणाला.

बऱ्याच अडथळ्यांनंतर ४ वर्षांनी रिलीज झाला होता चित्रपट

‘सतलुज’ या चित्रपटाचं मूळ नाव ‘पंजाब ९५’ (Punjab 95) असं होतं. पण हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवल्यावर अडचणी सुरू झाल्या. २०२२ मध्ये हा चित्रपट मंजुरीसाठी पाठवल्यावर सेन्सॉर बोर्डाने तब्बल १२७ कट्स करण्याची आणि चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केली होती. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, परंतु नंतर याचिका मागे घेण्यात आली. त्यानंतर २०२३ मध्ये, ‘टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मधील या चित्रपटाचं स्क्रिनिंग होणार होतं, तेही रद्द करण्यात आलं होतं.

या चित्रपटाला प्रदर्शित होण्यास जवळपास चार वर्षे अनेक अडचणी आल्या. त्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज न करता आणि कोणतेही बदल न करता थेट ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. निवडला. दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी यापूर्वी सांगितले होते की, ‘झी५’ वर आलेला ‘सतलुज’ हा चित्रपट कोणताही बदल न करता पूर्णपणे मूळ स्वरूपात आहे, “जसा तो आम्हांला नेहमी प्रेक्षकांसमोर आणायचा होता, तसाच कोणतेही बदल न करता मूळ स्वरुपात आम्ही सतलुज रिलीज केला आहे,” असं हनी त्रेहान म्हणाले होते.