Diljit Dosanjh Satluj Movie Release : गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ याचा मोठा चाहतावर्ग असून, त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. पण, त्याचा एक चित्रपट तीन वर्षांपासून कायद्याच्या चौकटीमध्ये अडकला होता. हा चित्रपट ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’चे (CBFC) प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे प्रदर्शित होत नव्हता. अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘पंजाब ९५’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे नाव आता बदलण्यात आले असून, ‘सतलुज’ म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हनी त्रेहान यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेला हा चित्रपट ‘झी ५’ हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला आहे.

मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये सत्यासाठी त्यांनी दिलेला अथक लढा आणि त्यांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. त्यामध्ये दिलजीत दोसांझने खालरा यांची मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच कंवलजीत सिंग, अर्जुन रामपाल, सुविंदर विकी व गीतिका विद्या ओहलयान यांनीही त्यात काम केले आहे. त्यामध्ये ८० आणि ९० च्या दशकातील पंजाबमधील परिस्थिती मांडण्यात आली आहे. या चित्रपटाला विरोध होत होता. तसेच ‘सीबीएफसी’चे प्रमाणपत्र मिळत नसल्याने तीन वर्षांपासून त्याचे प्रदर्शन रखडले होते. अखेर मोठ्या सेन्सॉरशिप व कायदेशीर लढाईनंतर चित्रपटाचे नाव बदलून तो ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे.

का होते ‘सतलुज’चे प्रदर्शन प्रलंबित?

‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिग्दर्शक हनी त्रेहान म्हणाले, “हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही याबद्दल थोडी निराशा वाटली; पण आता प्रेक्षक हा सिनेमा जसा बनवला गेला होता तसा पाहू शकतील याचा दिलासा आहे. ही माझ्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे. चित्रपटाचे शीर्षक बदलण्याव्यतिरिक्त यात कोणतेही बदल किंवा तडजोड करण्यात आलेली नाही,” ‘सीबीएफसी’ने (CBFC) सुमारे १२७ कट सुचवल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन बराच काळ प्रलंबित राहिले होते. परंतु, निर्मात्यांनी विशेषतः दोसांज आणि त्रेहान यांनी त्या अटी मान्य करण्यास नकार दिला होता.

मूळ टायटल कायम ठेवता आले नाही तरी…

पुढे ते म्हणाले, “साडेतीन वर्षांपासून चिपटाला मान्यता देण्यासाठी आणि प्रमाणपत्र देण्यासाठी CBFC कडून कोणत्याही हालचाली होत नव्हत्या. आता चित्रपट प्रदर्शित होतोय तर ही आमच्या टीमची जिद्द आहे. ‘झी ५’ आणि विशेषतः निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाला खंबीर पाठिंबा दिला. ‘सतलुज’ सिनेमामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नसले तरी मूळ टायटल कायम ठेवता आले नाही; त्यामागे अनेक कारणे आहेत. तरीही सतलुज हे नाव ठेवण्यासाठी कोणतीही हरकत नव्हती. कारण- सुरुवातीला चित्रपटाचे नाव ठरवताना हे पर्यायी नाव होते. जेव्हा ‘पंजाब ९५’ हे नाव निवडले होते, तेव्हा सतलुज हे नाव यादीत होतेच.”