दर आठवड्याला ओटीटीवर नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतात, परंतु त्यातील काहीच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. सध्या ओटीटीवर एका रोमँटिक चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट चित्रपटगृहात फार दिवस टिकलाही नाही आणि चांगली कमाई करू शकला नाही. थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेला हा चित्रपट आता ओटीटीवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून तो सध्या ट्रेंडिंग आहे.

नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा दबदबा

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय, त्याचे नाव आहे ‘दो दिवाने दो शहर में’. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. यामध्ये मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत. थिएटरनंतर आता १७ एप्रिलपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला.

नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ ट्रेंडिंग लिस्टमध्ये या चित्रपटाने दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. या शर्यतीत त्याने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले असून प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा खूप आवडली. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नसेल आणि तुम्हाला एखादा चांगला रोमँटिक ड्रामा पाहायचा असेल, तर तुम्ही घरबसल्या याचा आनंद घेऊ शकता. ‘IMDb’वर या चित्रपटाला ६.६ रेटिंग मिळालं आहे.

‘दो दिवाने दो शहर में’ चित्रपटाची कथा

‘दो दिवाने दो शहर में’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ही कथा स्वप्न नगरी मुंबईत घडते. ही गोष्ट शशांक आणि रोशनी यांची आहे. शशांक हा नोकरी करणारा एक तरुण आहे, ज्याला बोलताना अडथळा येतो. त्याला श उच्चारता येत नाही, तो स असं म्हणतो, त्यामुळे तो लोकांशी बोलताना घाबरतो. दुसरीकडे, रोशनी ही एक आत्मविश्वास असलेली मुलगी आहे, पण ती आपल्या दिसण्याबाबत फारशी खुश नसते. तिला तिचं नाक चांगलं नाही, असं वाटतं. त्यामुळे ती मोठा चश्मा घालत असते.

शशांक व रोशनी दोघेही अरेंज मॅरेजच्या निमित्ताने एकमेकांना भेटतात. शशांक होकार देतो, पण रोशनी नकार देते. रोशनीने नकार का दिला हे शशांकला जाणून घ्यायचं असतं. त्यानिमित्ताने शशांक तिच्या घराबाहेर जातो आणि तिच्याशी बोलताना प्रयत्न करतो. मग दोघे कॉफी प्यायला भेटतात आणि मग एक अनोखं नातं हळूहळू फुलू लागतं. मात्र, मोठ्या शहरातील वास्तव, करिअरचा दबाव आणि स्वतःच्या उणिवांविरुद्ध असलेला लढा त्यांच्या या नात्याची वारंवार परीक्षा घेतो.

थिएटरमध्ये फ्लॉप ठरला चित्रपट

‘दो दिवाने दो शहर में’ या चित्रपटाला चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. ‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ ६.६० कोटी रुपयांची कमाई केली होती, ज्यामुळे तो फ्लॉप ठरला.