अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा चित्रपट २ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. अभिषेक पाठकने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात तब्बू, श्रीया सरन, इशिता दत्ता, जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘दृश्यम ३’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तुम्ही ‘दृश्यम ३’ पाहिला असेल आणि आता अशाच काही थरारक चित्रपटांच्या शोधात असाल, ज्यांचा शेवटपर्यंत सस्पेन्स कायम राहतो, तर हे ५ थ्रिलर चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की असायला हवेत.

‘महाराजा’ हा २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये विजय सेतुपती यांनी न्हाव्याची भूमिका साकारली आहे. चोरीला गेलेल्या ‘लक्ष्मी’ नावाच्या भांड्याची तक्रार करण्यासाठी ते पोलिसांकडे जातात. मात्र, हळूहळू या प्रकरणातून एक मोठं गूढ समोर येतं.निथिलन स्वामीनाथन यांनी दिग्दर्शन केलेला ‘महाराजा’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

‘जाने जान’ हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये करीना कपूर खान, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा माया नावाच्या महिलेभोवती फिरते. तिच्या एक्स-पतीच्या मृत्यूनंतर ती त्याचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करते आणि तिचा शेजारी नरेन तिला मदत करतो. दरम्यान, पोलीस अधिकारी करण या प्रकरणाचा तपास करत असताना हळूहळू सत्याच्या जवळ पोहोचतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

‘अंधाधुन’ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये आयुष्मान खुरानाने आकाश नावाच्या पियानो वादकाची भूमिका साकारली आहे. आकाश एका हत्येचा साक्षीदार बनतो आणि स्वतःला अंध असल्याचं भासवल्यामुळे अडचणीत सापडतो. यानंतर चित्रपटाची कथा अधिक रंजक होते.या चित्रपटात तब्बू आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘अंधाधुन’ जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे.

‘कहानी’ हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये विद्या बालनने विद्या बागचीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा एका गर्भवती महिलेची आहे, जी आपल्या बेपत्ता पतीचा शोध घेण्यासाठी लंडनहून कोलकात्याला येते. या शोधादरम्यान तिच्यासमोर अनेक रहस्यं उलगडत जातात. या चित्रपटात परमब्रत चॅटर्जी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शाश्वत चॅटर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुजॉय घोष यांनी दिग्दर्शित केलेला ‘कहानी’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

‘पोर थोजिल’ हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अशोक सेल्वनने पोलीस अधिकारी प्रकाशची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा शहरात सातत्याने होत असलेल्या हत्यांच्या तपासाभोवती फिरते. या चित्रपटात आर. सरथकुमार आणि निखिला विमल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘पोर थोजिल’ SonyLIVवर स्ट्रीम होत आहे.