प्रेक्षकांचं थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट, वेब सीरिज पाहण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. नेटफ्लिक्स हे असे एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे, जिथे जुने-नवे चित्रपट आणि वेब सीरिज सतत ट्रेंडिंगमध्ये असतात. सिनेप्रेमी मनोरंजनासाठी नेटफ्लिक्सला मोठी पसंती देतात. सध्या या प्लॅटफॉर्मवर एक ११ वर्षे जुना चित्रपट टॉप-५ मध्ये ट्रेंड करत आहे. या सुपरहिट चित्रपटाची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
२०१५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला होता आणि आता पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊया नेमका हा चित्रपट कोणता आहे.
ज्या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव ‘दम लगा के हईशा’ (Dum Laga Ke Haisha) आहे. चित्रपटाची कथा १ तास ५० मिनिटांची आहे. ‘यशराज फिल्म्स’ बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली असून तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
‘दम लगा के हईशा’ चित्रपटाची कथा
या चित्रपटाची कथा एका तरुणाभोवती फिरते, ज्याचे लग्न एका जास्त वजन असलेल्या मुलीशी लावून दिले जाते. तो आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नसतो आणि त्याला पत्नीपासून दूर जायचं असतं. जेव्हा त्याच्या पत्नीला ही गोष्ट समजते, तेव्हा ती सासर सोडून माहेरी निघून जाते आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते. त्यांचे लग्न मोडण्याच्या उंबरठ्यावर असतानाच कथेत असं काही घडते की त्यांच्यात प्रेम फुलतं. हाच ट्विस्ट चित्रपटाची कथा अधिक मनोरंजक बनवतो.
दम लगा के हईशा सिनेमातील कलाकार व कलेक्शन
या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर तब्बल ११ वर्षांनी हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटाचे एकूण बजेट साधारण १४ ते १५ कोटी रुपये होते. यामध्ये निर्मिती खर्च सुमारे ९ कोटी रुपये होता. जाहिरात आणि प्रदर्शनाचा खर्च ५ ते ६ कोटी रुपये होता. चित्रपटाची सुरुवात संथ झाली होती, पण प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे कमाईत मोठी वाढ झाली. ‘दम लगा के हईशा’ चित्रपटाने भारतात ४२ कोटींचे कलेक्शन केले होते. तर जगभरात ७१.८५ कोटींची कमाई केली होती.
IMDb रेटिंगमध्येही अव्वल
‘दम लगा के हईशा’च्या उत्कृष्ट कथेचा अंदाज तुम्ही त्याच्या IMDb रेटिंगवरून लावू शकता. या चित्रपटाला ७.५/१० असे जबरदस्त रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवा. तुम्हाला प्रेमकथा असलेले चित्रपट आवडत असतील तर तुम्ही तो वीकेंडला पाहू शकता.

