Trending Indian Series onNetflix : ओटीटीवर दररोज नवनवीन चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होत असतात. त्यापैकी काही सीरिज ट्रेंडिंगमध्ये येतात, तर काही मात्र प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरतात. पण एखादी सीरिज सलग ८-९ महिने ट्रेंडिंग लिस्टमध्ये असणं तशी दुर्मिळ गोष्ट आहे. मात्र, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीची एक सीरिज गेल्या ८ महिन्यांपासून नेटफ्लिक्सच्या टॉप-१० ट्रेंडिंग यादीत कायम आहे. अवघ्या ७ एपिसोड्सच्या या सीरिजमध्ये मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय तस्करी आणि कस्टम्स विभागाची थरारक कथा दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये इमरान हाश्मीबरोबर मराठी कलाकारही आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालणाऱ्या या सीरिजचे नाव ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ (Taskaree: The Smuggler’s Web) आहे. या सीरिजमध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. बॉलीवूडचा ‘सीरिअल किसर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमरान हाश्मीची ही सीरिज १४ जानेवारी २०२६ ला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. ही सीरिज तुम्ही पाहिली नसेल तर वीकेंडला पाहू शकता. कारण गेल्या ८ महिन्यांत इतक्या नवीन सीरिज येऊनही तस्करीची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे.

नेटफ्लिक्सवरील तस्करी सीरिजचे रेटिंग

जानेवारीनंतर आता सप्टेंबर महिना आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली तेव्हा ही सीरिज पहिल्या क्रमांकावर होती. सध्या ती पहिल्या क्रमांकावर नसली तरीही सतत टॉप-१० मध्ये स्थान टिकवून आहे. प्रेक्षक ही सीरिज आवडीने पाहत आहेत आणि याच कारणामुळे ती सध्या १० व्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे, पण टॉप-१० च्या बाहेर गेलेली नाही. या सीरिजला आयएमडीबीवर ७.१ रेटिंग मिळाले आहे. आतापर्यंत नेटफ्लिक्सवर अनेक सीरिज आल्या, पण कोणीही ‘तस्करी’ची क्रेझ मात्र कमी झालेली नाही.

तस्करी सीरिजची कथा

या सीरिजची कथा मुंबई विमानतळावरील तस्करीच्या स्मगलिंग पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये कस्टम्स विभागाची एक टीम एका आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचा सामना कसा करते, हे दाखवण्यात आलं आहे. ही थरारक कथा सस्पेन्स आणि ड्रामाने भरलेली आहे. नीरज पांडे दिग्दर्शित या सीरिजमध्ये इमरान हाश्मीबरोबर झोया अफरोज, अनुराग सिन्हा, अमृता खानविलकर, नंदिश संधू आणि शरद केळकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.