Maharashtrachi Hasyajatra Actor Shares Fan’s Story : कलाकार आणि चाहत्यांमध्ये अनेकदा मजेशीर घटना-प्रसंगं होत असतात. सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षात चाहते अनेकदा आवडत्या कलाकाराशी लग्न करायचं अशी इच्छाही व्यक्त करत असतात. काही कलाकारांबरोबर असं घडलं आहे. असाच चाहतीने लग्नाची मागणी घातल्याचा एक भन्नाट किस्सा एका लोकप्रिय अभिनेत्याने शेअर केला आहे. हा अभिनेता म्हणजे प्रथमेश शिवलकर.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथमेश घराघरांत पोहोचला आहे. अभिनेता असण्याबरोबरच तो लेखकसुद्धा आहे. लवकरच त्यानं लिहिलेलं ‘लाडकी विहीण योजना’ हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच नाटकानिमित्त दिलेल्या एक मुलाखतीत प्रथमेशनं चाहतीने घातलेल्या लग्नाच्या मागणीचा किस्सा सांगितला आहे.
लग्न कराल का? चाहतीने केलेलं प्रपोज
कलाकृती मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याला चाहत्यांकडून मिळालेल्या प्रशंसेबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यानं सांगितलं, “नाटक संपल्यानंतर अनेक प्रेक्षक भेटायला येतात, मुली भेटतात आणि म्हणतात, ‘अरे! तू छान दिसतोस’. असंच एका मुलीने मला विचारलेलं, ‘तुमचं लग्न झालंय का? नसेल तर कराल का?’ पण ते मी फक्त कौतुक अन् प्रशंसा म्हणून घेतलं. कारण समोरच्याला आपला अभिनय, आपलं व्यक्तिमत्व आवडलेलं असतं. त्यामुळे कलाकार समोर दिसल्यानंतर अनेकदा प्रेक्षकांना काय करू काय नको असं होतं आणि त्यांच्याकडून ते आपसूक येतं. त्यामुळे हा किस्सा माझ्या कायम लक्षात राहील. पण यात मला त्या मुलीचा बिनधास्तपणा आवडला.”
प्रथमेशने चाहत्यांचा किस्सा केला शेअर
यानंतर अभिनेत्याने प्रेक्षकांनी केलेल्या त्याच्या कौतुकाचा एक किस्साही शेअर केला. तो म्हणाला, “मी आता जे ‘थेट तुमच्या घरातून’ नाटक करतोय. त्यामध्ये जेव्हा माझी एन्ट्री होते, तेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्यांचा वगैरे आवाज येतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमुळे मला घराघरांत पम्या म्हणून ओळखतात. तर नाटकात एन्ट्री घेतल्यानंतर प्रेक्षकांमधूनही पम्या असा आवाज येतो. एन्ट्री झाल्यानंतर मी पाच सेकंद थांबतो. तेव्हा प्रेक्षकांचा माझ्या एन्ट्रीनंतरचा आवाज ऐकल्यानंतर वाटतं, चला आपली लोकं आली आहेत.”
दरम्यान, प्रथमेश शिवलकरबद्दल सांगायचं झालं तर तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोमधील विविध विनोदी भूमिकांमधून तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. तसंच तो काही सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता असण्याबरोबरच प्रथमेश लेखनही करतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अनेक स्किट्स तो लिहितो. अशातच त्यानं लिहिलेलं ‘आमची लाडकी विहीण’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत मुख्य भूमिकेत आहेत.
