Farah Khan Vlog Shreya Kalra Winner : श्रेया कालरा ही नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप २’ या रिअॅलिटी शोची विजेती ठरली आहे. रितेश देशमुख व फराह खान यांनी सूत्रसंचालन केलेल्या हा शो लोकप्रिय ठरला होता. स्पर्धकांमधील खुलासा आणि वाद यामुळे शो चर्चेत आला होता. यामध्ये शिवांगी जोशीला मागे टाकत श्रेया कालरा विजेती ठरली. या निकालानंतर सोशल मीडियावर फराह खानने पक्षपातीपणा केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला होता. याबाबत आता फराहने थेट श्रेयाला प्रश्न विचारले आहेत.

बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती फराह खान ही तिच्या युट्युब चॅनलवर सेलिब्रिटींच्या घराची झलक दाखवत असते. नुकत्याच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये फराहने तिचा कुक दिलीप मुखियासह श्रेया कालराच्या घरी भेट दिली. यावेळी दोघींनी ‘लॉक अप’ आणि इतर अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तसेच श्रेया विजयी झाल्यानंतर फराहला सोशल मीडियावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत ट्रोल केले होते. याबाबत श्रेयाला स्पष्टपणे प्रश्न विचारत फराहने सोशल मीडियावरील चर्चांना ब्रेक लावला आहे.

काय म्हणाली फराह खान?

फराह खानने यूट्यूब चॅनेलवरील नुकत्याच शेअर केलेल्या व्ह्लॉगमध्ये अभिनेत्री श्रेयाच्या मुंबईतील घरी भेट दिली. यावेळी फराहने श्रेयाला विचारलं, “मला हे ऑन रेकॉर्ड सर्वांसमोर विचारायचं आहे, श्रेया, तू शोमध्ये येण्यापूर्वी आपण कधी भेटलो होतो का? तुला स्टेजवर भेटण्यापूर्वी मी कधीतरी तुझी भेट घेतली होती का?” यावर श्रेयाने ‘नाही’ असं उत्तर दिलं. यावर फराहने शोच्या निकालानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या ट्रोलिंगबद्दल श्रेयाला सांगितलं.

फराह म्हणाली, “निकालाच्या दोन आठवड्यांनंतर मला कळलं की, लोक मला ‘पक्षपाती होस्ट’ म्हणत आहेत. आणि याचं कारण काय तर, तुझं सोशल मीडिया आणि माझं यूट्यूब चॅनेल हे ‘क्यूकी’ नावाची एकच टीम मॅनेज करते. पण ही कंपनी फक्त आमचे नाही तर अशा अजून ७० कंटेंट क्रिएटर्सचे अकाऊंटचं काम बघते. अशा चर्चांनंतर मी स्वतः त्या कंपनीला फोन करून विचारलं की, ‘श्रेया तुमच्या टीमबरोबर काम करते का?’ त्यांनी हो, असं सांगितलं. पण मला याबद्दल आधी काहीच कल्पना नव्हती, तरीही मी पक्षपाती (बायस्ट होस्ट) कशी काय ठरले माहीत नाही,”

यावर श्रेया म्हणाली, “पण खरं सांगायचं तर सुरुवातीपासून तुम्हीच मला टार्गेट केलं होतं. पहिल्याच आठवड्यात तुम्ही माझ्यावर ओरडलात. मी चांगला खेळ खेळत असतानाही तुम्ही फक्त माझ्यावरच ओरडत होतात. आकांक्षा चौधरीबरोबर माझं भांडण झालं, तेव्हाही तुम्ही मला जास्त खूश होऊ नकोस असं सांगितलं होतं. कारण – तेव्हा मी प्रेक्षकांमध्ये चर्चेमध्ये होते, पण माझ्यामुळे नाही तर तिच्यामुळे चर्चेत होते. यावर फराह मिश्किलपणे म्हणाली, “मी तुला चांगला खेळ खेळली नाहीस असं कधीच सांगितलं नाही,” यावर त्या दोघींनी हसताना दिसून आल्या.

फराह खानवर ‘लॉक अप’मध्ये पक्षपात केल्याचा आरोप

‘लॉक अप’ शोच्या शेवटच्या भागामध्ये श्रेया कालरा आणि शिवांगी जोशी यांच्यपैकी एक विजेती ठरवण्यासाठी आधीचे स्पर्धक, जेलर आणि प्रेक्षकांचे मतदान ग्राह्य धरण्यात आले. स्पर्धकांसह कार्यक्रमाचे सूत्रसंचालक फराह खान व रितेश देशमुख यांना मतदान करण्यास सांगितले होते. या सर्व मतांच्या आधारे विजेत्याची निवड करण्यात आली. श्रेया कालरा विजयी झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे फराह खानवर निकालानंतर पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत आता तिने थेट श्रेया कालराला विचारले आहे.