Gandhi Talks OTT Release : आजच्या काळातील कलरफुल आणि बोलपटांच्या जगात मूकपट प्रदर्शित होणं आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं ही खरं तर चांगली बाब आहे. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा दमदार कलाकारांची मेजवानी असलेला एक मूकपट प्रदर्शित झाला होता, ज्याचं नाव आहे गांधी टॉक्स. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
हल्ली थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला की, अनेकांना तो ओटीटीवर कधी येणार याची उत्सुकता असते. अशातच आता गांधी टॉक्स हा अजून एक चित्रपट ओटीटीवर आला असून, ज्यांना चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहता आला नाही ते आता घरबसल्या ओटीटीवर हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
ओटीटीवर कुठे पाहायचा गांधी टॉक्स?
गांधी टॉक्स या चित्रपटाची कथा मराठमोळ्या व्यक्तीभोवती फिरते आणि त्याचं दिग्दर्शनही किशोर पांडुरंग बेलेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकानं यांनी केलं आहे. त्याशिवाय यामध्ये लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते विजय सेतुपती, अदिती राव हैदरी, अरविंद स्वामी आणि सिद्धार्थ जाधवसारखे दमदार कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांत पाहायला मिळतात. सिनेसृष्टीतील या दमदार कलाकारांचा चित्रपट गांधी टॉक्स हा चित्रपट घरबसल्या ओटीटीवर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. हा चित्रपट शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी ओटीटीवर रिलीज झाला आहे.
३० जानेवारी २०२६ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. त्यापूर्वी ‘गांधी टॉक्स’चा प्रीमियर शो गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. एकही संवाद नसलेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. सध्या अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट रेंटवर उपलब्ध असल्यानं हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागतील. तसे केल्यास तुम्ही घरबसल्या हा चित्रपट पाहण्याचा अनुभव घेऊ शकता. माध्यमांच्या वृत्तानुसार दोन आठवड्यांनंतर हा चित्रपट रेग्युलर स्ट्रीमिंगमध्ये येईल. त्यानंतर हा सिनेमा नियमित अभिदाते (सबस्क्रायबर्स)ही पाहू शकतील.
‘गांधी टॉक्स’ची कथा काय आहे?
चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचं झालं, तर यामध्ये दाखवण्यात आलं की, पैशांमुळे माणसांवर कसा परिणाम होऊ शकतो. चित्रपटात एक उद्योजक त्याच्या आयुष्यातील भ्रष्टाचार आणि इतर समस्यांमुळे त्रस्त असतो, असं पाहायला मिळतं. त्याव्यतिरिक्त चित्रपटात अजून दोन कलाकार आहेत, जे पोटापाण्याची सोय होण्यासठी छोटी-मोठी कामं करत असतात, ज्यांची त्या श्रीमंत उद्योजकाशी भेट होते आणि त्यानंतर जे होतं त्यावरच हा चित्रपट आधारित आहे. दोन तास १३ मिनिटांचा हा चित्रपट आहे.
