Gauahar Khan with Zaid Darbar Kushal Tandon : प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेला ‘द अलायन्स’ हा शो नुकताच संपला असून यामध्ये अभिनेत्री मिनी माथूर विजेती ठरली आहे. शो संपल्यानंतर सर्व स्पर्धकांनी एकत्रित येत आनंद साजरा केल्याचे दिसून आले. ‘अलायन्स’मधील वाद, टास्क आणि स्पर्धकांचे भावनिक क्षण याची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. यामध्ये सोहेल खान व सीमा सजदेह यांचे नाते आणि गौहर खानचा पती झैद दरबार आणि तिचा एक्स कुशल टंडन यांची चर्चा रंगली. शोमध्ये कुशलने अप्रत्यक्षपणे गौहरचा उल्लेख केल्याने तो चर्चेमध्ये आला होता. आता शो संपल्यानंतर गौहर, झैद आणि कुशल हे एकत्र पार्टी करताना दिसून आले आहे.

‘अलायन्स शो’ संपल्यानंतर रॅप-अप पार्टी करण्यात आली. यामध्ये स्पर्धकांनी सहभागी होत यशस्वी शोनंतर आनंद व्यक्त केला. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्री गौहर खानने या पार्टीतील काही क्षण शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने विजेती मिनी माथूरचे अभिनंदन केले. मात्र तिच्या या पोस्टमधील शेवटच्या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये गौहर, तिचा पती झैद दरबार, मिनी माथूर आणि गौहरचा एक्स कुशल टंडन हे चौघे एकाच फोटोमध्ये दिसत आहेत.

गौहर खानच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘अलायन्स’ रॅप-अप पार्टीतील फोटो शेअर करत गौहरने लिहिले, “नम्रता, संयम आणि सन्मानाने मिळवलेल्या या विजयासाठी मिनी माथूरचे खूप खूप अभिनंदन! आजची संध्याकाळ खरोखरच खूप खास ठरली. भरपूर मजा, आनंद आणि सुंदर आठवणींची ही संध्याकाळी होती,” अशा आशयाच्या कॅप्शनसह गौहरने काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘शेवटच्या फोटोमुळे मी स्तब्ध झालो,’ तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ‘या शोमधील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे झैद आणि कुशल यांच्यात निर्माण झालेली खास मैत्री, त्यांचं नात नकारात्मकतेपासून लांब राहिलं पाहिजे,’ तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, ‘गौहर, प्लीज आता तू या दोघांच्या मैत्रीत कधीही येऊ नकोस,’

दरम्यान, शोमध्ये कुशल टंडनने गौहर खानचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला होता. त्याच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती. जिममध्ये वर्कआउट करताना झैद म्हणाला, “मी तुझ्याकडे सिगारेट मागितली होती, कारण माझ्याकडची वाईट होती. यावर कुशल मिश्कीलपणे म्हणाला, “तुला सगळ्या माझ्याच गोष्टी आवडतात.” कुशलच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. यानंतर झैदने व्हिडीओ शेअर करत माफीसुद्धा मागितली होती.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी गौहर खान व कुशल टंडन हे रिलेशनशिपमध्ये होते. २०१३ मध्ये ‘बिग बॉस ७’च्या घरात त्यांची ओळख झाली होती. यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. मात्र, २०१४ मध्ये गौहर व कुशल यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर गौहरने २०२० मध्ये झैद दरबारशी विवाह केला. या जोडप्याला आता जेहान आणि फरवान अशी दोन अपत्य आहेत.