Ghabadkund OTT Release: थिएटरमध्ये अनेक सिनेमे प्रदर्शित होतात. काही सिनेमांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते, तर काही सिनेमांना मिळत नाही. जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले सिनेमे ओटीटीवर पुन्हा प्रदर्शित होतात, त्यावेळीही त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. अनेकदा असेही घडते, ज्या सिनेमांना थिएटरमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळत नाही, अशा सिनेमांना ओटीटीवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. आता ‘घबाडकुंड’ हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
थिएटर गाजवल्यानंतर ‘घबाडकुंड’ ओटीटीवर प्रदर्शित
‘घबाडकुंड’ या सिनेमात अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचे सांगितले. ती म्हणाली, “घबाडकुंड हा सिनेमा आता अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे, ज्यांना पुन्हा हा सिनेमा पाहायचा आहे, तसेच ज्यांना कामामुळे किंवा काही इतर कारणांमुळे थिएटरमध्ये हा सिनेमा पाहता आला नाही, त्यांना हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर पाहता येणार आहे.”
पुढे ती असेही म्हणाली, “तुम्ही आतापर्यंत या सिनेमाला जेवढं प्रेम दिलं आहे याच्या दुप्पट, तिप्पट, दहापट सिनेमाला प्रेम द्या. हा सिनेमा नक्की बघा. जसं आम्ही थिएटरमध्ये प्रेक्षकांना भेटण्यासाठी आल्यानंतर सगळ्यांना सांगायचो की तुम्ही या सिनेमाचा नक्की आनंद घेणार आहात, तर आता घरात बसून तुमच्या कुटुंबाबरोबर तुम्ही या सिनेमाचा आनंद घेऊ शकता.”
प्रेक्षकांचे आभार मानत वैष्णवी म्हणाली, “तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे हा सिनेमा आठ आठवड्यांहून जास्त थिएटरमध्ये चालला, त्यामुळे खूप थँक्यू. आमच्यावर तुमचं प्रेम असंच राहू द्या”, असे म्हणत वैष्णवीने कृतज्ञता व्यक्त केली. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, हा सिनेमा आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार अशाही कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
जून महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रीतम एस के पाटील यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात संदीप पाठक, देवदत्त नागे, वैष्णवी कल्याणकर, शशांक शेंडे, कुशल बद्रिके असे अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.
दरम्यान, आता थिएटरप्रमाणेच सिनेमाला ओटीटीवरही तितकाच प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
