Bharat Bhhagya Viddhaata OTT release : अभिनेत्री कंगना रणौत व मराठी अभिनेत्रींची मांदियाळी असलेला ‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट आता चित्रपटगृहांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. १२ जून रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, तरीही बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. त्यामुळे, आता हा चित्रपट ओटीटीवर कशी कामगिरी करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता घरबसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टपासून झी5 वर रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या डिजिटल रिलीजची घोषणा करताना ओटीटी प्लॅटफॉर्मने नवीन ट्रेलरसुद्धा रिलीज केला आहे. हा चित्रपट २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची गोष्ट सांगतो. कामा हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांचे रक्षण केले होते, ते या चित्रपटात पाहायला मिळते.

भारत भाग्य विधाता चित्रपटाबद्दल कंगना रणौत म्हणाल्या…

काही कथा अशा असतात ज्या कोणत्याही परिस्थितीत जगासमोर आल्या पाहिजेत आणि ‘भारत भाग्य विधाता’ ही त्यांपैकीच एक आहे, असं कंगना रणौत म्हणाल्या. अभिनेत्री आणि निर्माती म्हणून कंगनासाठी हा चित्रपट अत्यंत खास आहे.

२६/११ च्या हल्ल्यादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न ठेवता केवळ आपले कर्तव्य आणि माणुसकीला प्राधान्य दिले. स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणं यासाठीही महत्त्वाचं आहे, कारण ते आठवण करून देतं की देशाची सेवा केवळ सीमेवर तैनात असलेले जवानच करतात असं नाही, तर संकटाच्या वेळी सामान्य नागरिकही असाधारण धैर्य दाखवून देशसेवा करतात, असंही कंगना रणौत म्हणाल्या.

भारत भाग्य विधाताची कथा

चित्रपट २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यामध्ये त्या अज्ञातांची शौर्य गाथा दाखवण्यात आली आहे, ज्यांनी कामा अँड अल्ब्लेस हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचे जीव वाचवले. चित्रपटात नर्सेस, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचे धैर्य आणि समर्पण दाखवण्यात आले आहे.

‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटातील कलाकार

कंगना रणौत, गिरिजा ओक, स्मिता तांबे, प्रसाद ओक, सयाजी शिंदे, ईशा डे, प्रिया बेर्डे, सुषमा देशपांडे, अमृता नामदेव, सुहिता थत्ते, रसिका आगाशे, आशा शेलार, आदित्य मिश्रा या कलाकारांनी भारत भाग्य विधाता चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

भारत भाग्य विधाताचे कलेक्शन

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, भारत भाग्य विधाता चित्रपटाने देशभरात ७.०४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले, तर जगभरात याची एकूण कमाई ८.३२ कोटी रुपये आहे.