Sunita Ahuja Lock Upp 2 : नेटफ्लिक्सवर सुरू झालेला ‘लॉक अप २’ हा रिॲलिटी शो प्रचंड लोकप्रिय झाला आहे. रितेश देशमुख व फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पहिल्या दिवसांपासून स्पर्धकांचे वाद, धक्कादायक खुलासे आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे हा शो चर्चेत आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा या देखील स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. पहिल्या दिवसापासूनच त्या चर्चेमध्ये असून त्यांनी गोविंदाविषयी अनेक खुलासे केले आहेत. मात्र, नुकतेच शोमध्ये स्पर्धकांच्या जेवणावर बंधने घालण्यात आल्याने आणि खराब जेवण दिल्यामुळे सुनीता आहुजा यांचा संताप अनावर झाला आहे. त्यांनी निर्मात्यांना अर्वाच्च भाषेमध्ये बोलून नाराजी व्यक्त केली आहे.

मागील काही काळापासून सुनीता आहुजा आणि गोविंदा यांचे वैवाहिक नाते चर्चेचा विषय बनले आहे. दोघेही वेगळे होणार असल्याची चर्चा असताना त्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. सुनीता आहुजा या त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करताना दिसून येतात. ‘लॉक अप’मध्येही त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जेवणावरून त्यांनी राग व्यक्त केला असून गोविंदा त्यांना शोमध्ये जाण्यासाठी नको म्हणत असताना त्या शोमध्ये आल्याचा खुलासा सुनीता आहुजा यांनी केला आहे.

आम्हाला अन्नासाठी भीक मागावी लागेल का? – सुनीता आहुजा

‘लॉक अप’मध्ये सातव्या दिवशी पाठवण्यात आलेल्या जेवणामुळे सुनीता संतापल्या आणि इतर स्पर्धकांप्रमाणेच त्यांनीही खराब जेवण खाण्यास नकार दिला. सुनीता यांनी पुढे शिवीगाळ करत अर्वाच्च भाषेमध्ये राग व्यक्त केला. सुनीता म्हणाल्या, “विरोध करत नसल्यामुळे हे असे केले जात आहे. आता आम्हाला अन्नासाठी भीक मागावी लागेल का? तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर उभे राहिले पाहिजे. माझी सर्व मुलेही भुकेली आहेत. या सूपची चव गोमूत्रासारखी आहे, त्यात थोडी घाणही मिसळली आहे.”

गोविंदा नको म्हणत होता तरी… – सुनीता

दुसऱ्या दिवशी सकाळीही सुनीता आहुजा यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “मी सभ्यपणे वागत आहे आणि मी जशी आहे तशी वागत नाहीये; याचा अर्थ असा नाही की तुम्ही फुटेजसाठी असे काहीही कराल. मला आजच इथून निघून जायचे आहे. आता हे खूप अति झाले. माझा चीची (सुनीता पती गोविंदाला या नावाने हाक मारतात) मला सांगत होता नको जाऊ. इथे यायला तो नाही म्हणत होता तरी मी आले. जेव्हा जेव्हा मी त्याचे ऐकत नाही, तेव्हा तेव्हा मला पश्चाताप झाला आहे, मला इथे राहायचेही नाही.”

सुनीता आहुजा ‘लॉक अप’मध्ये का सहभागी झाल्या?

यापूर्वी स्क्रीनशी बोलताना सुनीता आहुजा यांनी ‘लॉक अप २’ शोमध्ये येण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या, “मी ‘लॉक अप’ करण्याचा निर्णय घेतला, कारण एकता कपूरचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझंही तिच्यावर प्रेम आहे. ती माझा मुलगा यशबरोबर एक चित्रपट करत आहे आणि आम्हा दोघांना एकत्र लाँच करत आहे. मला ‘राईझ अँड फॉल’, ‘द ५०’, ‘ट्रेटर्स’, ‘अलायन्स’ अशा अनेक रिॲलिटी शोच्या ऑफर्स आल्या होत्या, पण मी ‘लॉक अप’ शो निवडला. कारण मला वाटलं की ‘लॉक अप’मध्ये माझी व्यवस्थित काळजी घेतली जाईल.”