Gram Chikitsalay Season 2 : पहिल्या सीझनच्या घवघवीत यशानंतर टीव्हीएफची लोकप्रिय सीरिज ‘ग्राम चिकित्सालय’ चा दुसरा सीझन २३ जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. रिलीज होताच या सीरिजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. सीरिजला मिळणारं प्रेम त्याच्या व्ह्यूजमधून दिसतंय. निर्मात्यांनी एक खास पोस्ट करून या सीरिजला आतापर्यंत ३.५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्याचं सांगितलं आहे. ‘ग्राम चिकित्सालय’ ही भारतातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप १० सीरिजमध्ये सामील झाली आहे. एका डॉक्टरचं गावातलं आयुष्य दाखवणारी ही सीरिज आहे.

राहुल पांडे दिग्दर्शित व टीव्हीएफची निर्मिती असलेली ‘ग्राम चिकित्सालय’ सीरिज भटकंडी गावातील साधी गोष्ट सांगते. गावातील लोक, त्यांचे डॉक्टरबद्दल असलेले गैरसमज, गावातील राजकारण, आरोग्याबद्दल जनजागृतीचा अभाव या गोष्टी सीरिजमध्ये पाहायला मिळतात. या सीरिजमधील कलाकारांनी उत्तम अभिनय करून आपल्या भूमिका वठवल्या आहेत. अमोल पराशर व अनुष्का रंजन यांनी या सीरिजमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सीरिजला मिळाले दमदार व्ह्यूज

निर्मात्यांनी सीरिजला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या सीझनला आतापर्यंत ३.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ‘भटकंडी गावातील ग्राम चिकित्सालय आता देशभरात धुमाकूळ घालत आहे,’ असं कॅप्शन निर्मात्यांनी पोस्टला दिलं आहे.

या सीरिजमध्ये निर्मात्यांनी गावात डॉक्टरांबद्दल जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अंधश्रद्धा दूर करण्याचाही प्रयत्न केला आहे. या सीरिजची भावनिक कथा व गावाकडच्या हलक्या फुलक्या प्रसंगांनी लोकांची मनं जिंकली. त्यामुळेच पहिल्या सीझननंतर दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय.

टीव्हीएफच्या गाजलेल्या सीरिज

टीव्हीएफच्या सीरिज म्हटलं की चर्चा तर होणारच. कारण टीव्हीएफच्या सीरिज आपल्या दमदार व वास्तविक कथांमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होतात. आतापर्यंत त्यांनी अनेक हिट सीरिज बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यामध्ये ‘अॅस्पिरेंट्स’, ‘सपने व्हर्सेस एव्हरीवन’, ‘पंचायत’, ‘ग्राम चिकित्सालय’ आणि ‘संदीप भैया’ या जबरदस्त व गाजलेल्या सीरिजचा समावेश आहे.

अलीकडेच पार पडलेल्या ‘प्राइम व्हिडीओ प्रेझेंट्स’ या कार्यक्रमात, टीव्हीएफने आपल्या आगामी चित्रपटांबाबत आणि वेब सीरीजबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या कार्यक्रमादरम्यान ‘कॉलेज फेस्ट’ (College Fest), ‘पिरामिड’ (Pyramid) आणि ‘वंश’ (Vansh) यांसारख्या नवीन कलाकृतींचीही घोषणा करण्यात आली.