काही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवतात. पण ओटीटीवर त्या चित्रपटांना खूप चांगली पसंती मिळते. असाच एक चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही, पण ओटीटीवर मात्र तो ट्रेंडिंग आहे.

२ जानेवारीला नेटप्लिक्सवर एक १३१ मिनिटांचा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात थिएटरमध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट मागील १२ दिवसांपासून नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे.

नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग आहे चित्रपट

नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांकडून चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता, पण आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे.

हा सिनेमा ज्या महिलेच्या आयुष्यावर बेतलेला आहे, तिने तिच्या हक्कांसाठी कठोर संघर्ष केला आणि वर्षानुवर्षे तिच्या पतीविरुद्ध न्यायालयात लढा दिला होता. या महिलेचा पती दुसरं लग्न करतो आणि तिला घटस्फोट देतो. पण तो घटस्फोट कायदेशीररित्या नसतो, त्यामुळे ती त्याला कोर्टात खेचते. या चित्रपटाचं नाव आहे ‘हक’. हा चित्रपट २ जानेवारीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

‘हक’ या चित्रपटाला कलाकारांकडून आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच, ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनंतर, ‘हक’ नेटफ्लिक्सवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. पहिल्या आठवड्यात हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग होता. ‘हक’ ला IMDb वर ७/१० रेटिंग देखील मिळाले आहे.

‘हक’चे बजेट ४० ते ५० कोटी रुपये आहे. बॉक्स ऑफिसवर त्याने फक्त २० कोटी रुपयांची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर बजेट वसूल न करू शकलेला हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. OTT वर चित्रपट पाहिल्यानंतर कियारा अडवाणी आणि अंकिता लोखंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपटाचे कौतुक केले होते.

हेही वाचा

सत्य घटनेवर आधारित चित्रपट

यामी गौतमचा ‘हक’ हा चित्रपट १९८० च्या दशकातील शाह बानो खटल्यावर आधारित आहे. या प्रकरणात तिला तिच्या हक्कांसाठी एक मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने तिच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला होता. या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती.