Harshad Chopda sacrifices for Shivangi Joshi: नेटफ्लिक्सवरील लॉक अप या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन चांगलाच गाजत आहे. आता शो अंतिम टप्प्यात आला आहे. या शोमध्ये राम कपूर, श्रेया कालरा, शिल्पा शिंदे, आकांक्षा चौधरी, आकांक्षा चमोला, हर्षद चोपडा, शिवांगी जोशी, योगेश रावत, असे अनेक लोकप्रिय कलाकार आणि इतर रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक पाहायला मिळाले. त्यातील काही स्पर्धक एलिमिनेट झाले आहेत.

शोमध्ये स्पर्धकांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक सीक्रेट उघडपणे सांगितली. त्याची मोठी चर्चा झाली. स्पर्धकांमध्ये भांडणे होताना पाहायला मिळाली. तसेच, काही स्पर्धकांची मैत्री पाहायला मिळाली.

हर्षद चोपडाने शिवांगी जोशीसाठी सोडला शो

या शोमध्ये हर्षद चोपडा आणि शिवांगी जोशी यांच्यात उत्तम मैत्री पाहायला मिळाली. त्यांनी याआधी एका मालिकेतही एकत्र काम केले आहे. त्यांच्यातील मैत्रीला शिल्पा शिंदे, श्रेया कालरा यांनी वेगळे नाव दिल्याचे पाहायला मिळाले. ते फक्त मित्र नसून, त्यांच्यात नाते असल्याचेदेखील म्हटले गेले.

फायनलिस्ट होण्यासाठी शिवांगी व हर्षद हे दोन स्पर्धक होते. त्यामध्ये हर्षद फायनलिस्ट झाला. त्यानंतर शिवांगी रडताना दिसली. तसेच, तो फायनलिस्ट होण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त पात्र आहे का, असेही म्हणाली. त्यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले.

या शोमध्ये श्रेया कालराला एका स्पर्धकाला घराबाहेर पाठविण्याची संधी मिळाली. त्यावेळी तिने शिवांगीचे नाव घेतले. त्यानंतर हर्षदने श्रेयाला तिचा निर्णय बदलावा, असे सांगितले. शिवांगीनेसुद्धा ती शोमधून बाहेर जाण्यासाठी का पात्र नाही, हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

हर्षद शिवांगीला त्याची फायनलिस्टची जागा देऊ शकतो आणि तो तिच्याऐवजी एलिमिनेट होऊ शकतो, असे त्याला सांगण्यात आले. हर्षद शिवांगीच्या जागी एलिमिनेट झाला. घराबाहेर जाण्याआधी होस्ट रितेश देशमुखला हर्षद म्हणाला, “सर, आतापर्यंत मी सतत ऐकत आलोय की, मी स्वतःसाठी खेळत नाहीये, मी खोटं वागतोय आणि अभिनय करतोय; पण मी स्वतःसाठीच खेळत होतो आणि असं काही होईल, याची मला कल्पना नव्हती. मला सध्या ठीक वाटत नाहीये. जर शिवांगी शोमधून बाहेर पडली, तर मला आयुष्यभर त्याचा पश्चात्ताप राहील.”

दरम्यान, ‘लॉकअप सीझन २’चे विजेतेपद कोण पटकावणार , हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.