Akanksha Choudhary Recall Casting Couch : ‘लॉक अप’ हा रिअॅलिटी शो आता फिनाले वीकमध्ये पोहचला आहे. या शोचे सात स्पर्धकही निश्चित झाले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका भागात अनेक भावनिक गोष्टी समोर आल्या. तसंच दोन स्पर्धकांना एलिमेनशनमुळे शोला टाटा बाय बाय करावं लागलं. आकांक्षा चौधरी ही स्पर्धक या शोमधून बाहेर पडली. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या आकांक्षाने ब्युटी पेजेंट इंडस्ट्रीत तिला सामना करावा लागलेल्या कास्टिंग काऊचच्या प्रकाराबाबत भाष्य केलं. ज्यामुळे इतर स्पर्धक आणि अँकर सगळेच भावनिक झाले.

आकांक्षा चौधरीने काय सांगितलं?

“मी शोमधून बाहेर पडले आहे, पण मला वाटलं होतं की मी सेफ होईन. मी लॉक अप या गेम शोमध्ये जेवढं चांगलं खेळता आलं तेवढं खेळले. मला इथे काही चांगले मित्र-मैत्रिणी मिळाले. काही लोकांकडून मला शिकायलाही मिळालं. मी स्पर्धेच्या पहिल्या दिवशीही म्हटलं होतं की इथे येणं हे माझं स्वप्न होतं. मागच्या एका शोमध्येही दोन दिवस राहिले होते आणि जिंकू शकले नाही. आता मला वाटलं होतं की मी खूप काही गोष्टी शांतपणे करेन असं वाटलं होतं. कारण सिक्रेट रुममध्ये राहिले तेव्हा मी बऱ्याच गोष्टी माझ्याविषयी ऐकल्या होत्या. मी चिडणार नाही, नियंत्रित खेळ करेन असं वाटलं होतं. पण दोन पावलं मागेच राहिले.” असं म्हणत आकांक्षाने एलिमेनशन स्वीकारलं पण तिला खूप रडू येत होतं. यानंतर तिने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला.

Akanksha Choudhary lock upp 2 Photo-Screen
आकांक्षा चौधरी स्पर्धेतून बाहेर पडली आहे. त्यावेळी तिने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला. (फोटो-Screen)

कास्टिंग काऊचबाबत आकांक्षा चौधरी काय म्हणाली?

“हा शो सोडून जाता जाता मी एक सिक्रेट सांगू इच्छिते, मी एका पॅजेंटसाठी गेले होते. ट्रेनिंगची फी, गारमेंट्स, कपडे यासाठी मला साधारण एक ते दोन लाख रुपयांची गरज होती. घरी पैसे नव्हते. तेव्हा मला एका व्यक्तीची आठवण झाली. मी त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही कारण तो खूप मोठा माणूस आहे. मी त्यांना खूप वर्षांपासून ओळखत होते. कारण आधीही ते अशा स्पर्धांमध्ये जज म्हणून आले होते. मी त्यांच्याकडे गेले, कारण त्यांनी माझ्याप्रमाणे इतर स्पर्धकांनाही आर्थिक मदत केली आहे. मी त्यांना सांगितलं सर मला दोन महिन्यांसाठी आर्थिक मदत देऊ शकलात तर बरं होईल. तुम्ही जे काही काम करता त्यात मी काम करेन, नोकरी करेन. मला साधारण एक ते दोन लाख रुपयांची गरज आहे. त्यावर ते मला म्हणाले की हो चालेल ना. का नाही, तू ये आणि मला भेट. मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. मी त्यांच्या घरी पहिल्यांदा जात नव्हते. त्याआधीही गेले होते.” असं आकांक्षाने सांगितलं.

मी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी मला थेट बेडवर ढकललं आणि..

त्यानंतर आकांक्षा म्हणाली, “मी जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा ते समोरुन येत होते. मला ते मिठी मारतील असं मला वाटलं होतं. पण त्यांनी मला ढकललं आणि मला खेचलं. माझ्या छातीवर हात ठेवले आणि मला घासू लागले. ते त्यांचे हात हटवत नव्हते. त्यांचं वय झालेलं होतं. मी त्यांना बाजूला केलं. तर मला ते म्हणू लागले, तुझ्यातला अहंकार जरा कमी झाला आहे ते बरं झालं. तू वर्षभरापूर्वी आली होतीस तेव्हाही मी तुला पाहिलं होतं तुझे विचार तेव्हा अगदीच कोते आणि संकुचित होते. तू आधीच माझ्याबरोबर शय्यासोबत केली असतीस तर आज कुठल्या कुठे निघून गेली असतीस. तुझ्याकडे अमुक प्रोजेक्ट असता, तमुक सिनेमात तू काम करत असतीस. मी तुला एवढे पैसे देतो आहे तर तुला माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवावे लागतील. एका महिन्यातून चार ते पाच वेळा सेक्स करावा लागेल. मी त्यांना म्हटलं की सर हे मला काहीही माहीत नव्हतं. मला जर हे ठाऊक असतं तर मी आले नसते. मी हे काही करु शकणार नाही. तर मला म्हणाले की तुझे विचार बदलले असतील असं मला वाटलं होतं. पण तू अजूनही तसेच संकुचित विचार करतेस. दोन वर्षांनी तुला खूप पश्चात्ताप होईल. तू पैसे घेतले नाहीस म्हणून. सेक्स केल्याशिवाय आणि फेवर दिल्याशिवाय कुणीही मोठं होत नाही. पण ते म्हणाले तसं काही घडलं नाही. सहा महिन्यांनी मला चांगला शो मिळाला आणि वर्षभराने मी इथे उभी आहे. मी त्यांना नाही म्हटलं होतं, ज्याचा मला पश्चात्ताप नाही.” असं आकांक्षा चौधरीने सांगितलं.