Prithviraj Sukumaran Film I Nobody OTT Release update : ओटीटीवर दर आठवड्याला अनेक धमाकेदार चित्रपट रिलीज होत असतात. या आठवड्यातही प्रेक्षकांना घरबसल्या एकापेक्षा एक दमदार चित्रपट पाहायला मिळणार आहेत. अशाच एका चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एका महिन्यापूर्वीच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला चांगले रिव्ह्यूज मिळाले होते, पण बॉक्स ऑफिसवर तो हिट होऊ शकला नाही. आता हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. पृथ्वीराज सुकुमारनचा हा बहुप्रतीक्षित हीस्ट थ्रिलर कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे, याची माहिती समोर आली आहे.

आपण पृथ्वीराज सुकुमारनच्या ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव ‘आय, नोबडी’ (I, Nobody) आहे. ९ जुलै रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन निस्साम बशीरने केलं होतं. चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.

कुठे पाहायचा हा चित्रपट?

४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘आय, नोबडी’ चित्रपटाने जगभरात केवळ १५ कोटी रुपयांची कमाई केली होती. सिनेमागृहात हा चित्रपट फार दिवस टिकला नाही. आता हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर रिलीज केला जाईल. नुकतीच जिओ हॉटस्टारच्या सोशल मीडिया पेजवर ‘आय, नोबडी’च्या ओटीटी रिलीज डेटची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट २५ ऑगस्टपासून ओटीटीवर पाहायला मिळेल. हा चित्रपट तुम्ही मल्याळम भाषेबरोबरच तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषेतही पाहू शकता.

चित्रपटाची कथा

ही कथा राजीवन (पृथ्वीराज सुकुमारन) या सरकारी कर्मचाऱ्याची आहे, जो एका बँकेतील चोरीदरम्यान अडकतो. दरोडेखोर त्याला बळजबरीने स्वतःबरोबर घेऊन जातात. पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा सर्व दरोडेखोरांचा मृत्यू होतो. शेवटी पोलिसांच्या नजरेत राजीवनच या चोरीचा मास्टरमाइंड ठरतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात खऱ्या आव्हानांना सुरुवात होते. हा चित्रपट खूपच रंजक आहे. तुम्हाला तो शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

पृथ्वीराजबरोबर या चित्रपटात पार्वती, सूरज वेंजारामोडू, महेंद्रन, गणपती, विजय राघवन, अशोकन या कलाकारांनीही विविध भूमिका साकारल्या आहेत. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तो घरबसल्या पाहू शकता.