करोनाच्या साथीनंतर भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. लोक आपल्या फोनवर जगभरातील कंटेंट पाहू शकतात. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओ, झी 5, जिओहॉटस्टार हे काही आघाडीचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स आहेत. पण याव्यतिरिक्त असेही काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यावर अश्लील कंटेंटचे प्रसारण केले जाते. अशाच काही प्लॅटफॉर्म्सवर सरकारने मोठी कारवाई केली आहे.
देशात डिजिटल कंटेंटची वाढती लोकप्रियता पाहता, सरकारने आता ओटीटी प्लॅटफॉर्म्ससंदर्भात कडक भूमिका घेतली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, अश्लील कंटेंट स्ट्रीम केल्याच्या आरोपाखाली पाच ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. आयटी कायदा आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोडनुसार हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या म्हणण्यानुसार, या प्लॅटफॉर्मबद्दल असंख्य तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या अॅप्सवर दाखवल्या जाणाऱ्या काही कंटेंटवर बऱ्याच काळापासून आक्षेप घेण्यात येत होता. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सरकारने घातली बंदी?
MoodXVIP, Koyal Playpro, Digi Movieplex, Feel आणि Jugnu हे पाच ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत. हे प्लॅटफॉर्म बऱ्याच काळापासून आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट प्रसारित करत आहेत, असा आरोप आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना या अॅप्सचा अॅक्सेस ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे युजर्स हे अॅप्स वापरू शकणार नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्लॅटफॉर्म बोल्ड आणि आक्षेपार्ह कंटेंट असलेली दृश्ये दाखवत होते. काही कौटुंबिक नात्यांशी संबंधित चुकीची, आक्षेपार्ह दृश्ये दाखवली जात होती. तसेच काहींनी ब्लॉक केल्यानंतर, नवीन डोमेन तयार करून स्ट्रीमिंग पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली.
यापूर्वीही झाली होती कारवाई
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सरकारने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जुलै २०२५ मध्ये, अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रदर्शित केल्याबद्दल २५ ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये या प्लॅटफॉर्मना वॉर्निंग देण्यात आली होती आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी सुधारणा न केल्याने ते ब्लॉक करण्यात आले.
सध्या ब्लॉक केलेल्या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मने या कारवाईबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आयटी नियम २०२१ नुसार, या अॅप्सचा अॅक्सेस पूर्णपणे ब्लॉक करण्यात आला आहे.

