Samay Raina Indias Got Latent Season 2 : कॉमेडियन समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटंट’चा दुसरा सीझन सुरू करीत दमदार पुनरागमन केले आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल आणि सुकृत देव याचा अभिनय सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जबरदस्त वादानंतर समयने पुन्हा एकदा शो सुरू केल्यामुळे तरुणाईने मोठ्या उत्साहात पहिल्याच एपिसोडला प्रतिसाद दिला. ‘इंडियाज गॉट लेटंट’चा दुसरा सीझन हा नेटफ्लिक्ससह यूट्यूबवरही प्रदर्शित झाला आहे. एखादा शो हा सशुल्क आणि नि:शुल्क अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रेक्षकांनी दोन्हीपैकी कोणत्या प्लॅटफॉर्मला जास्त पसंती दिली याची आकडेवारी समोर आली आहे.
पहिल्याच भागामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या ‘अल्फा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या शोमध्ये आल्या होत्या. दोघींची उपस्थिती आणि विनोद हे लक्षवेधी ठरले आहेत. शोमधील अनेक रील या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या असून, नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.
दर आठवड्याला प्रदर्शित होणार नवीन एपिसोड
या शोमधील मराठी कलाकार सुकृत देव लोकप्रिय झाला असून, त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’चा दुसरा सीझन हा साप्ताहिक स्वरूपात प्रदर्शित केला जाणार आहे. “द ग्रेट इंडियन कपिल शो’प्रमाणे दर आठवड्याला नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यूट्यूब या मोफत माध्यमावर एपिसोड उपलब्ध असल्यामुळे नेटफ्लिक्सच्या व्ह्युजवर त्याचा परिणाम झाला आहे.
व्ह्युजची आकडेवारी आली समोर
‘इंडियाज गॉट लेटंट’च्या दुसऱ्या सीझनला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळत असला तरी यूट्यूब आणि नेटफ्लिक्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. समय रैनाच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या पहिल्या भागाला २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तब्बल ४.५ कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. मात्र, नेटफ्लिक्सवरील आकडेवारी यापेक्षा खूपच कमी असल्याचे समोर आले आहे.
‘इंडियाज गॉट लेटंट’च्या एपिसोडला नेटफ्लिक्सवर किती व्हुज?
नेटफ्लिक्सच्या अधिकृत टुडम (Tudum) डेटानुसार, या एपिसोडला २२ लाख व्ह्युज मिळाले असून, हा शो सध्या ग्लोबल टॉप १० नॉन-इंग्लिश शोच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. नेटफ्लिक्सने दिलेल्या माहितीनुसार, व्ह्युजची संख्या ही एकूण पाहिलेल्या तासांची संख्या आणि एपिसोडच्या कालावधीच्या आधारे मोजली जाते.
मराठमोळा सुकृत देव ठरला लक्षवेधी
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन २’मध्ये सुकृत देव नुकताच झळकला आणि त्याने त्याच्या काही क्षणांच्या सादरीकरणातून अनेकांची पसंती मिळवली आहे. सुकृतने ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन २’मध्ये एका दारूड्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. सुकृतने त्याची पात्रावरील पकड, अभिनय यांमुळे कार्यक्रमात उपस्थित सर्वांची मनं जिंकून घेत, कौतुकाची दाद मिळवली. मराठी मालिका आणि रंगभूमीवर काम करणाऱ्या सुकृतने या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी माध्यमांच्या वृत्तानुसार सहा ते सात हजार इतके फॉलोअर्स होते, ज्यामध्ये आता वाढ झाली असून इन्स्टाग्रामवर दोन लाख ५४ हजार इतके फॉलोअर्स झाले आहेत.
