आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट प्रचंड वाढला असून त्यावर असलेला बोल्ड कंटेंट चांगलाच चर्चेत येत आहे. अनेक ओटीटी शो आणि मालिकांमध्ये अश्लीलता, नग्नता, शिवीगाळ, हिंसक दृश्य यांचं भडिमार असतो ज्याचा मुलांवरही खूप वाईट परिणाम होत आहे, या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यापुढे ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली असभ्यता आणि अश्लीलता खपवून घेतली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
नागपूर येथील पत्रकार परिषदेत अनुराग ठाकूर म्हणाले “सर्जनशीलतेच्या नावाखाली अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अपमानास्पद आणि अश्लील मजकूर वाढत असल्याच्या तक्रारींबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. यासंदर्भात नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज भासल्यास त्यावर विचार करण्याची मंत्रालयाची तयारी आहे.
आणखी वाचा : दीपक तिजोरीला निर्मात्याने घातला २.६ कोटी रुपयांचा गंडा; मुंबई पोलिसांत तक्रार दाखल
शिवाय “या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना अश्लीलतेचे नव्हे तर क्रिएटिव्हिटीचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. यासाठी जी काही आवश्यक कारवाई करावी लागेल ती सरकार करणार आहे.”असंही अनुराग ठाकूर या पत्रकार परिषदेत म्हणाले. याबरोबरच गेल्या काही वर्षात ओटीटी कंटेंट संदर्भात येणारया तक्रारी वाढल्याचंसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जर एखाद्या कलाकृतीवर कुणी आक्षेप घेऊन तक्रार केली असून तर त्यांच्या ९० ते ९२% शंकांचं निरसन निर्मात्यांनी करणं अपेक्षित आहे. यातून काही पर्याय न निघल्यास सरकार यामध्ये लक्ष घालते असंही त्यांनी नमूद केलं. पण गेल्या काही दिवसांत तक्रारींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने सरकार यासंदर्भात गरज असल्यास ठोस पावलं उचलेल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.