सध्या हॉरर चित्रपटांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा ‘ईव्हिल डेड बर्न’ (Evil Dead Burn) हा चित्रपट त्यातील अंगावर काटा आणणाऱ्या दृश्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचदरम्यान, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक हॉरर-थ्रिलर चित्रपटही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा चित्रपट सध्या जिओ हॉटस्टारवर प्रचंड लोकप्रिय ठरत असून ट्रेंडिंगमध्ये आहे. नेमका हा चित्रपट कोणता आहे, जाणून घेऊया.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज काही ना काही नवीन ट्रेंड होत असतं. यात नव्याने प्रदर्शित झालेले चित्रपट आणि वेब सीरिजबरोबरच काही जुने चित्रपटही पुन्हा लोकप्रिय ठरतात. याचप्रमाणे, आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो गेल्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता मात्र ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळवत असून ट्रेंडिंगमध्ये आहे.
काय आहे चित्रपटाची कथा
हा चित्रपट तेलुगू चित्रपटसृष्टीतील असून हॉरर-थ्रिलर जॉनरचा आहे. चित्रपटाची कथा चार मित्रांभोवती फिरते. हे चौघेही भूत-प्रेताच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा आणि तांत्रिकांचे पितळ उघडे पाडण्याचे काम करतात. मात्र, एका तांत्रिकाने त्यांना एका झपाटलेल्या हवेलीत एक रात्र घालवण्याचे आव्हान दिल्यानंतर त्यांच्या आयुष्यात मोठं संकट ओढवतं. त्यानंतर घडणाऱ्या थरारक आणि भीतीदायक घटनांमुळे चित्रपट अधिकच रंजक बनतो.
यानंतर त्या झपाटलेल्या हवेलीतील भयानक घटनांना सुरुवात होते आणि त्या चार मित्रांचं आयुष्य एका क्षणात बदलून जाते. या थरारक घटनांभोवतीच जवळपास दोन तासांचा हा चित्रपट फिरतो. या चित्रपटाचं नाव ‘ईशा’ (Isha) असून हा तेलुगू हॉरर-थ्रिलर चित्रपट सध्या जिओ हॉटस्टारवरील टॉप-१० ट्रेंडिंगमध्ये आहे.
जर तुम्हाला हॉरर-थ्रिलर चित्रपटांची आवड असेल, तर ‘ईशा’ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ओटीटीवरील पाहायलाच हव्या अशा हॉरर चित्रपटांमध्ये त्याचा समावेश आहे. अंगावर काटा आणणारी कथा, रहस्यमय वातावरण आणि थरारक प्रसंग यामुळे हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
