Jannat Zubair Slams Shilpa Shinde: ‘नेटफ्लिक्स’वरील ‘लॉक अप २’ या ओटीटी शोमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदेने अभिनेत्री शिवांगी जोशीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर शिल्पाच्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी शिल्पाला ट्रोल केले आहे. तिने शिवांगीच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि रिलेशनशिपवर खळबळजनक वक्तव्य केले होते, यामुळे शिल्पा शिंदे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली असून अनेकांनी शिवांगीला पाठिंबा दिला आहे. आता शिवांगीची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री जन्नत जुबैरने शिल्पा शिंदेच्या वक्तव्यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत स्त्रीच्या चारित्र्यावर टीका करणं ही मनोरंजनाची गोष्ट नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.
रितेश देशमुख व फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘लॉक अप २’ हा ओटीटी शो जोरदार चर्चेमध्ये आला आहे. यामध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे सहभागी झाली. शिल्पा आल्यापासून तिच्या वक्तव्यांमुळं आणि वादांमुळं चर्चेमध्ये राहिली आहे. आता तिचा शिवांगी जोशीबरोबर वाद झाला आहे. मात्र, यानंतर शिल्पा शिंदेने शिवांगीच्या व्हर्जिनिटीबाबत आणि प्रत्येक शोमध्ये मुलांबरोबर रिलेशनशिप ठेवत असल्याचे म्हणत वादग्रस्त विधान केले. यावरून जन्नत जुबेरने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करीत शिल्पाच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे जन्नत जुबैरची पोस्ट?
इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत जन्नतने लिहिलं, एखाद्या व्यक्तीबद्दल नीट माहीत नसतानाही लोक त्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल सहज मत तयार करतात. मी शिवांगीला अनेक वर्षांपासून ओळखते आणि तिची मूल्यं आणि संस्कार तसेच ती कशी व्यक्ती आहे, हे मला माहीत आहे; त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल अशा पद्धतीनं बोलणं हे मला अजिबात पटत नाही.”

शिवांगी, मी कायम तुझ्याबरोबर – जन्नत
पुढे तिने लिहिलं, “तुम्हाला एखाद्या व्यक्तीची मतं पटणार नाहीत, त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता किंवा तुमचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. पण, एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर टीका करणं ही कधीच मनोरंजनाची गोष्ट असू शकत नाही. शिवांगी, मी कायम तुझ्याबरोबर आहे,” अशा आशयाची पोस्ट जन्नत जुबेरने केली आहे. शिवांगीच्या चारित्र्यावर भाष्य करीत तिची मिमिक्री करणाऱ्या शिल्पा शिंदेवर जन्नत जुबैरनं नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाली होती शिल्पा शिंदे?
शिवांगी जोशीबद्दल शिल्पा शिंदे म्हणालेली, “हिनं जे काही शो केले आहेत, त्या प्रत्येक शोमध्ये जाऊन तिनं मुलांबरोबर अफेअरच केलं आहे. कुशाल टंडन तर तिच्यापेक्षा वयानं कितीतरी मोठा आहे, तरीही त्यांच्याबरोबर हिचं अफेअर होतं.” सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये शिल्पाने शिवांगीची मिमिक्री करीत व्हर्जिनिटीवर भाष्य केलं. शिल्पा म्हणालेली, “मी तर खूप निरागस आहे, मला तर यातलं काहीच माहीत नाही, मी तर व्हर्जिन आहे; लग्नानंतरही मी ते करणार नाही.”
