Jio Hotstar Asur Web Series: तुम्हाला जर सस्पेन्स सीरिज पाहायला आवडत असतील, तर जिओ हॉटस्टारवरील ही सीरिज अजिबात चुकवू नका. कारण या सीरिजचा एक एपिसोड पहिल्यानंतर पुढचा एपिसोड पाहण्याची तुमची उत्सुकता वाढेल. त्यामुळे ही सीरिज तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच असायला हवी. या सीरिजचे दोन सीझन आहेत आणि ते पाहत असताना ‘खरा गुन्हेगार नेमका कोण आहे?’ हा प्रश्न तुम्हाला पडत राहील. विशेष म्हणजे याचंच उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला दोन्ही सीझन शेवटपर्यंत पाहावे लागतील. प्रेक्षकांनी या क्राईम थ्रिलर सीरिजला भरभरून पसंती दिली आहे. या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले असून ‘IMDb’ वर याला ८.५ असे उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे. जर तुम्ही ही सीरिज अजून पाहिली नसेल, तर कदाचित तुम्ही ओटीटीवरील सर्वात दमदार सस्पेंस सीरिजपैकी एक मिस करत आहात.
कोणती आहे ही सीरिज?
आम्ही ज्या सीरिजबद्दल बोलतोय तिचं नाव ‘असुर’ (Asur) आहे. या सीरिजचा पहिला सीझन २ मार्च २०२० रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर दुसरा सीझन १ जून २०२३ रोजी आला. दोन्ही सीझन मिळून यामध्ये एकूण १६ एपिसोड्स आहेत. पहिल्या सीझनमध्ये ८ आणि दुसऱ्या सीझनमध्ये ८ एपिसोड्स आहेत.
‘असुर’ची कथा
‘असुर’ची एक क्राईम थ्रिलर सीरिज आहे. यात प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य समोर येते. या कथेची सुरुवात बनारस येथील एका घटनेने होते. यानंतर कथा ११ वर्षे पुढे जाते आणि एका फॉरेन्सिक एक्सपर्टच्या अवतीभवती फिरते. त्याला काही रहस्यमयी ‘कोऑर्डिनेट्स’ मिळतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी एक मृतदेह आढळतो. यानंतर सीबीआय टीम अशा एका सिरियल किलरच्या शोधात निघते, जो प्रत्येक वेळी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे असतो. जशी जशी चौकशी पुढे सरकते, तशी ही कथा आणखीनच रंजक होत जाते.
दुसऱ्या सीझनमध्ये आणखी वाढतो थरार
दुसऱ्या सीझनमध्ये जुनेच कलाकार पुन्हा पाहायला मिळतात, पण कथा मात्र पुढे सरकते. सीबीआयला जाणवतं की ‘असुर’ अजूनही त्यांच्या तावडीत सापडलेला नाही. दुसऱ्या सीझनची कथा केवळ खुन्याला पकडण्यापुरती नाही, तर पात्रांमधील भीती, त्यांचे नातेसंबंध आणि भावनांवरही आधारित आहे. सीझन २ चा क्लायमॅक्स इतका दमदार आहे की अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत तुमची नजर स्क्रीनवरून हटणार नाही.
असुर सीरिजमधील कलाकार व रेटिंग
जिओ हॉटस्टारवरील या सीरिजमध्ये अर्शद वारसी, बरुण सोबती, अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा, पवन चोपडा, अमेय वाघ, शारिब हाश्मी आणि अभिषेक चौहान यांसारख्या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. या सीरिजचे क्रिएटर गौरव शुक्ला आहेत आणि दिग्दर्शन ओनी सेन यांनी केले आहे. IMDb वर या सीरिजला ८.५ रेटिंग मिळाले आहे. सस्पेंस आणि थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी ही सीरिज एक उत्तम पर्याय आहे. तुम्हीही ओटीटीवर काय पाहावं, असा विचार करत असाल तर ही दमदार सीरिज पाहू शकता.
