Jio Hotstar OTT Trending South Series : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या दाक्षिणात्य सीरिज आणि चित्रपटांचा डंका पाहायला मिळत आहे. जिओ हॉटस्टारवर बिग बॉस आणि खतरों के खिलाडी यांसारख्या रिअॅलिटी शोजसोबतच आता तमिळ सीरिजने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. ‘रिसॉर्ट’ या तमिळ फिक्शन ओरिजिनल शोने तब्बल १०० मिलियन वॉच ऑवर्सचा टप्पा पार करत एक नवीन इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे या शोला हिंदी, तेलगू आणि मल्याळम भाषिक प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘हार्ट बीट’ सीझन ३ हा मेडिकल ड्रामा देखील हिंदी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत असून या वीकेंडला ओटीटी शौकिनांसाठी मनोरंजनाची मोठी पर्वणी उपलब्ध झाली आहे.

‘रिसॉर्ट’ सीरिजने रचला इतिहास

जिओ हॉटस्टारवरील ‘रिसॉर्ट’ हा तमिळ शो भाषांच्या सीमा ओलांडून मिळालेल्या लोकप्रियतेचं एक उत्तम उदाहरण ठरलाय. या शोने १०० मिलियन वॉच ऑवर्सचा टप्पा पार केला आहे. ही कामगिरी करणारा हा जिओ हॉटस्टारचा पहिला फिक्शन ओरिजिनल शो बनला आहे. मात्र, या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला मिळालेला वेगवेगळ्या भाषांमधील व्यापक प्रतिसाद आहे.

या शोच्या एकूण वॉच टाइमपैकी ४७ टक्के व्ह्यूअरशिप ही तमिळव्यतिरिक्त इतर भाषेतील प्रेक्षकांकडून मिळाली आहे. यामध्ये हिंदी भाषिक प्रेक्षकांचा वाटा २२ टक्के, तेलगू प्रेक्षकांचा १५ टक्के आणि मल्याळम व कन्नड प्रेक्षकांचा वाटा १० टक्के आहे. भावना, नातेसंबंधांवर आधारित उत्तम कथा भाषेच्या मर्यादा ओलांडून नवीन प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचू शकतात, याचं उत्तम उदाहरण हा शो आहे.

‘हार्ट बीट’ सीझन ३ ला हिंदी प्रेक्षकांमध्ये होतोय लोकप्रिय

‘रिसॉर्ट’प्रमाणेच आता ‘हार्ट बीट’ या तमिळ फ्रँचायझीचा तिसरा सीझनही हिंदी प्रेक्षकांमध्ये आकर्षित करतोय. ‘हार्ट बीट’ सीझन ३ आता जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहे. ‘आरके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या पार्श्वभूमीवर आधारित हा मेडिकल ड्रामा व्यावसायिक आयुष्यातील आव्हानं, नातेसंबंध आणि वैयक्तिक निर्णयावर आधारित आहे. इथे हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या घटनांसोबतच पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक संघर्षही या कथेला पुढे नेतात.