Hunkkaar Trending on Jio Hotstar: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत असतात, पण काही मोजक्याच सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. जिओ हॉटस्टारवर शुक्रवारी, २५ सप्टेंबर रोजी रिलीज झालेली ‘हुंकार’ (Hunkkaar: The Roar) ही ६ एपिसोड्सची कोर्टरुम ड्रामा सीरिज सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अवघ्या तीन दिवसांतच या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून ती ट्रेंडिंग लिस्टमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

‘हुंकार’ (Hunkkaar: The Roar) या सीरिजमध्ये ‘सैयारा’ फेम अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहे. तिने अतिशय गंभीर भूमिका साकारली आहे. ‘सैयारा’नंतर अनीतचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. या सीरिजमध्ये तिने गंभीर पात्र उत्तमरित्या वठवलं आहे.

‘हुंकार’ सीरिजची कथा काय?

या सीरिजची कथा ओरछा येथील एका १७ वर्षांची मुलगी मीनू रावत हिच्याभोवती फिरते. मीनूची भूमिका अनीत पड्डाने केली आहे. मीनू सुनील चाकोसी उर्फ बापजी (रघुबीर) या एका स्वयंघोषित बाबावर बलात्काराचा आरोप करते. ती त्याच्याच शाळेची विद्यार्थिनी असते. त्याच आश्रमात राहून शिकत असते. मीनूचे आई-वडील या बाबाचे अनुयायी असतात. मीनूच्या या आरोपांनी खळबळ उडते. या प्रकरणाचा तपास नुकतीच आयपीएस झालेल्या एसीपी जसलीनकडे (फातिमा सना शेख) सोपवला जातो. त्यांच्या मदतीला वकील म्हणून अभिनेता मोहम्मद झीशान अय्युब आहे. आरोपीचा वकील (राम कपूर) जेव्हा मीनूचं वय व तिची लाइफस्टाइल यावरून प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा कथेत एक रंजक वळण येतं. मीनू खरं बोलतेय की हा फक्त एक कट आहे? असं तो म्हणतो. नंतर कथेत येणारा ट्विस्ट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

हुंकार (Hunkkaar) सीरिज जिओ हॉटस्टारवर शुक्रवारी, २५ सप्टेंबर रोजी रिलीज झाली आणि सध्या तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. या सीरिजमध्ये अनीत पड्डा, फातिमा सना शेख, झीशान अय्युब, रघुबीर यादव, राम कपूर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तुम्ही ही सीरिज पाहिली नसेल तर जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.