Ali Baba Aur 40 Bhoot Web Series JioHotstar : जिओ हॉटस्टारवर दर आठवड्याला अनेक हॉरर आणि थ्रिलर चित्रपट तसेच वेब सीरिज प्रदर्शित होत असतात, पण ‘अली बाबा और ४० भूत’ या सीरिजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक वेगळाच विक्रम रचला आहे. भुवनेश श्रीवास्तव यांनी निर्मित केलेली ही ४० भागांची हॉरर-कॉमेडी मिस्ट्री सीरिज गेल्या २८ दिवसांपासून टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर टिकून आहे. अभिनेत्री आशा नेगीने यामध्ये ‘अलीशा निगम’ नावाच्या घोस्ट हंटरची दमदार भूमिका साकारली आहे.

‘अली बाबा और ४० भूत’ ही सीरिज गेल्या २८ दिवसांपासून टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सीरिजचे आतापर्यंत २० एपिसोड आले असून, दर शुक्रवारी नवीन भाग प्रसारित केला जातो. यामध्ये एक घोस्ट हंटर भूतांचा सामना करताना दिसत आहे. या शोने व्ह्यूजच्या बाबतीत ‘बिग बॉस’ला मागे टाकलं नसलं, तरी ‘खतरों के खिलाडी’, ‘लाफ्टर शेफ अनलिमिटेड एंटरटेनमेंट’ आणि ‘बेथलम कुटुंब युनिट’ यांसारख्या शो आणि चित्रपटांना नक्कीच मागे टाकलंय.

२० भाग आणि अजूनही ट्रेंडिंग आहे सीरिज

ही सीरिज एकूण ४० भागांची आहे. या सीरिजचे नवीन भाग दर आठवड्याला येतात आणि आतापर्यंत २० भाग प्रदर्शित झाले आहेत. ‘अली बाबा और ४० भूत’चा प्रिमियर जिओ हॉटस्टारवर ११ सप्टेंबर रोजी झाला होता. भुवनेश श्रीवास्तव यांनी तयार केलेली ही सीरिज आहे. यात आशा नेगी, विशाल वशिष्ठ, रमनदीप यादव आणि मानसी सहगल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ही एक हॉरर आणि कॉमेडी मिस्ट्री मालिका आहे.

सीरिजची कथा

‘अली बाबा और ४० भूत’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री आशा नेगीने ‘अलीशा निगम’ नावाच्या एका घोस्ट हंटरची भूमिका साकारली आहे, जी आपल्या बेपत्ता झालेल्या पुरातत्वशास्त्रज्ञ वडिलांचा शोध घेण्यासाठी आपल्या गावी जाते. यात तिच्याबरोबर विशाल वशिष्ठ बाबाराव उपाध्यायच्या भूमिकेत आणि रमनदीप यादव किन्नूच्या भूमिकेत आहे. या संपूर्ण ४० भागांमध्ये वेगवेगळ्या भूतांच्या रंजक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.

आशा नेगीने ‘पवित्र रिश्ता’ या गाजलेल्या मालिकेत ‘पूर्वी’ची भूमिका साकारून मोठी लोकप्रियता मिळवली होती. तिच्या मालिकांपेक्षा ऋत्विक धनजानीसोबतचं तिचं नातं चांगलंच चर्चेत राहिलं होतं. पण त्यांचं ब्रेकअप झालं.