This Marathi Actress Auditioned for Heeramandi : कलाकारांना मनोरंजनविश्वात तग धरून राहण्यासाठी आणि सातत्याने कामं मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेक ऑडिशन्स द्यावी लागतात. यादरम्यान काहीवेळा त्यांना नैराश्याचाही सामना करावा लागतो. अशातच आता मराठमोळ्या अभिनेत्रीनेही तिच्या एका ऑडिशनचा किस्सा सांगितला आहे.
इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांबरोबर, दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम करता यावं अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, प्रत्येकाला ही संधी मिळतेच असं नाही. मिळाली तरी त्यासाठी संयम ठेवून वाट पाहावी लागते. प्रयत्नशील राहावं लागतं. असंच काहीसं घडलं लोकप्रिय अभिनेत्री जिया शंकरबरोबर.
जिया शंकर काय म्हणाली?
मराठमोळी जिया शंकर हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘सब टीव्ही’वरील ‘काटेलाल अँड सन्स’ या लोकप्रिय मालिकेत काम केलेलं, यामुळेच ती खऱ्या अर्थाने घराघरांत पोहोचली. पण, तिला पहिल्यांदाच मोठा ब्रेक मिळाला ते रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातून. यामध्ये तिने रितेशच्या प्रेयसीची भूमिका साकारलेली. यासह तिने रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. अशातच आता जियाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या लोकप्रिय सीरिजसाठी ऑडिशन दिली होती. परंतु, तिची यासाठी निवड झाली नाही असं म्हटलं आहे.
जिया ‘हिरामंडी’साठी दिलेल्या ऑडिनशबद्दल ‘फिल्मी ग्यान’शी संवाद साधताना म्हणाली, “मी हिरामंडीसाठी ऑडिशन दिलेली. मला जर त्या कलाकृतीचा भाग होण्याची संधी मिळाली असती तर खूप चांगलं झालं असतं. सीरिजमधील मुख्य मुलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली. जर मला संधी मिळाली असती तर मी माझे १०० टक्के दिले असते, खूप चांगलं काम केलं असतं. आलमजेबच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिलेली. मी अति आत्मविश्वासाने हे बोलत नाहीये, पण मला खात्री आहे की मी खूप उत्तमरित्या ती भूमिका साकारली असती.”
‘हिरामंडी’मध्ये आलमजेबच्या भूमिकेत अभिनेत्री शरमीन सेगल मेहता झळकलेली, तर तिच्यासह या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, रिचा चड्ढा, संजिदा शेख, अदिती राव हैदरी या अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकल्या होत्या. ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांचा सीरिजला चांगला प्रतिसाद मिळालेला.
दरम्यान, जिया शंकर नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावरून ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
