बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेला एक चित्रपट तब्बल १४ वर्षांनंतर ओटीटीवर पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटाने ओटीटीवरील टॉप १० यादीत स्थान मिळवलं असून, लोकप्रिय चित्रपटांना मागे टाकत आहे. हा एक सायन्स-फिक्शन अॅडव्हेंचर चित्रपट आहे. एका रहस्यमय बेटाभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
आपल्या आजोबांना वाचवण्यासाठी नायक त्या बेटावर पोहोचतो. मात्र, हे बेट अनेक गूढ रहस्यांनी भरलेलं असून लवकरच समुद्रात बुडणार असतं. चित्रपटातील अनेक दृश्ये प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात. उत्कंठावर्धक कथा आणि थरारक घटनांमुळे हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो.
१४ वर्षांपूर्वीचा चित्रपट ओटीटीवर होतोय ट्रेंड
हा एक हॉलिवूड चित्रपट असून फक्त १ तास ३३ मिनिटांचा चित्रपट आहे. १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. आता तब्बल दीड दशकानंतर हा चित्रपट ओटीटीवर पुन्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल
या चित्रपटाचं नाव ‘जर्नी २: द मिस्टिरियस आयलंड’ (Journey 2: The Mysterious Island) आहे. ब्रॅड पेटन (Brad Peyton) दिग्दर्शित हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ’ (२००८) या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात ड्वेन जॉन्सन, मायकेल केन, जोश हचरसन, व्हेनेसा हजन्स, लुईस गुजमान आणि क्रिस्टिन डेव्हिस यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
काय आहे चित्रपटाची कथा?
चित्रपटाची कथा शॉन अँडरसन (जोश हचरसन) आणि त्याचे सावत्र वडील हँक (ड्वेन जॉन्सन) यांच्याभोवती फिरते. एका सांकेतिक धोक्याच्या संदेशाचा (डिस्ट्रेस सिग्नल) मागोवा घेत ते दक्षिण पॅसिफिक महासागरातील एका रहस्यमय आणि अज्ञात बेटावर पोहोचतात. त्यांच्याबरोबर स्थानिक वैमानिक आणि त्याची मुलगीही असते. मात्र, हे बेट समुद्रात बुडण्यापूर्वी तिथे अडकलेल्या शॉनच्या आजोबांना वाचवण्यासाठी त्यांची जीवघेणी शर्यत सुरू होते.
‘जर्नी २’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
‘जर्नी २: द मिस्टिरियस आयलंड’ हा २०१२ मधील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता. प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारा हा चित्रपट आता तब्बल १४ वर्षांनंतर ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील टॉप १० ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. भारतातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक तो पाहत आहेत.
