ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट तसेच वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. ओटीटीवरील वैविध्यपूर्ण कलाकृती कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. ओटीटीवर काही चित्रपट प्रदर्शित होताच ट्रेंड करू लागतात, तर काही जुने चित्रपट अचानक चर्चेत येतात आणि पुन्हा एकदा लोकप्रिय होतात.
सध्या ओटीटीवर अशाच एका ९ वर्ष जुन्या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. ओटीटीवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. जर तुम्हाला ॲक्शन चित्रपटांची आवड असेल, तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा.
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो चित्रपट आहे, ‘जुमांजी: वेलकम टू द जंगल’. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक ॲक्शन-ॲडव्हेंचर कॉमेडी चित्रपट असून तो १९९५ मधील ‘जुमांजी’चा सीक्वल आहे. जेक कासडन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये ड्वेन जॉन्सन, जॅक ब्लॅक, केविन हार्ट आणि करेन गिलन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
काय आहे ‘जुमांजी’ चित्रपटाची कथा?
या चित्रपटाची कथा हायस्कूलमधील चार साध्या विद्यार्थ्यांभोवती फिरते. हे चारीही जण स्वभावाने एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असतात. एका दिवशी शाळेत शिक्षा म्हणून त्यांना एक जुना व्हिडिओ गेम साफ करायला सांगितला जातो. जेव्हा ते त्या गेम कन्सोलला स्पर्श करतात, तेव्हा अचानक सर्व काही बदलून जाते. हे चारीही विद्यार्थी स्वतःला एका धोकादायक जंगलात पाहतात आणि विशेष म्हणजे त्यांची शरीरं पूर्णपणे बदललेली असतात.
आता ते ‘जुमांजी’ गेमच्या आत अडकलेले असतात. त्यांची पात्रं आता अतिशय शक्तिशाली आणि धाडसी झालेली असतात. लाजाळू मुलगा आता एक ताकदवर डॉक्टर बनतो, तर दुसरा मुलगा प्राण्यांचा तज्ज्ञ बनतो. या चित्रपटातील सर्वात मजेशीर आणि भीतीदायक गोष्ट म्हणजे, या गेमचे नियम खऱ्या आयुष्यासारखेच आहेत. जर ते गेममध्ये मारले गेले, तर त्यांचा खेळ कायमचा संपणार असतो. या भीतीपोटी हे चारीही मुलं हळूहळू एक टीम म्हणून काम करू लागतात आणि एकमेकांची ताकद बनवतात.
‘जुमांजी’ हा चित्रपट कुठे पाहता येईल?
हा चित्रपट सध्या ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. गेल्या एका आठवड्यापासून हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १०’ ट्रेंडिंग यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत याला ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटाचे आयएमडीबी (IMDb) रेटिंग ६.९ आहे.

विशेष म्हणजे, इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. जर तुम्हाला काहीतरी हलकं-फुलकं आणि मनोरंजक पाहायचं असेल, तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहू शकता.
